

जमखंडी : येथील मोरे प्लॉटमधील एका तीन मजली घराला भीषण आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कामगाराची सुटका अग्निशामक दलाच्या जवानांनी केल्याने मोठा अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार मोरे प्लॉट परिसरातील वकील प्रकाश चौरड्डी यांच्या तीन मजली निवासस्थानाला रविवारी सकाळी आग लागली व यात घरातील वस्तू, फर्निचर जळून बेचीराख झाले असून १ कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रविवारी पहाटे ४ च्या सुमारास आग लागली आणि काही क्षणांतच ती इमारतीत विविध भागांमध्ये पसरली. आग लागल्याचे कळताच घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अनेक तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत अडकलेल्या कामगाराची अग्निशामक दलाने सुखरूप सुटका केली.
घरमालक वकील प्रकाश चौरडी यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच इमारतीत आपले कार्यालय सुरू केले होते. आगीचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून आग कशामुळे लागली याचा तपास करण्यात येत आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी एम. पी. हुगार व कर्मचारी, पोलिस खात्याचे आनंद हनमरत्ती, विलास इमानदार, तिपण्णा भंडारी, श्रीधर मालशेट्टी, कुमार दोड्डमनी, बसवराज रोली, दानय्या गणचारी, श्रवण कुमार आणि शेखर नायक आदींनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.