

बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी बेळगावात होणार्या मूक मोर्चाच्या जागृतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या म. ए. समितीच्या तिघा कार्यकर्त्यांची तृतीय जेएफएमसी न्यायालयाने सोमवारी (दि. 6) निर्दोष मुक्तता केली. केदारी करडी, मारुती पाटील व दत्ता येळ्ळूरकर अशी त्यांची नावे आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, 1 नोव्हेंबर 2016 वरील तिघांनी काळ्या दिनी निघणार्या मूक मोर्चाच्या जागृतीसाठी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नही तो जेल में, मूक मोर्चाला आम्ही चाललो आहोत तुम्ही येणार आहे ना, जय महाराष्ट्र असा मजकूर अशा प्रकारचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
त्याबद्दल खडेबाजार पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सातेनहळ्ळी यांनी या तिघांचे मोबाईल जप्त करुन 24 ऑक्टोबर 2016 रोजी भादंवि 153(अ) अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी जेएमएफसी तृतीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, न्यायालयात सरकारी पक्षाला गुन्हा साबित करता न आल्याने न्यायालयाने तिघांचीही निर्दोष मुक्तता केली.
तिघांचे मोबाईल परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ते मोबाईल या तिन्ही कार्यकर्त्यांनी स्वीकारले नाहीत तर ते सरकारजमा करावेत असे आदेशात म्हटले आहे. या कार्यकर्त्यांच्या वतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. प्रताप यादव, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. रिचमॅन रिकी, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. प्रज्वल अथणीमठ यांनी काम पाहिले.