

ज्ञानेश्वर पाटील
बेळगाव : ‘ए फ्रेंड इन नीड, इज अ फ्रेंड इन्डीड...’ ही मैत्रीची पारंपरिक व्याख्या. इथे फ्रेंड म्हणजे फक्त मनुष्यच अपेक्षित होता; मात्र बदलत्या काळात ही व्याख्या बदलते आहे; विशेषतः ‘जेन झी’ अर्थात नव्या पिढीच्या बाबतीत. या ‘जेन झी’चे समवयस्क मित्र आहेतच; पण तितक्याच आणि काही बाबतीत त्यापेक्षाही अधिक मैत्री त्यांची पाळीव प्राण्यांशी आहे. थोडक्यात पाळीव प्राणी हे ‘जेन झी’चे ‘स्ट्रेस बस्टर’ झाले आहेत.
करिअरची चिंता, अभ्यासाचा ताण, सोशल मीडियावर ‘परफेक्ट’ दिसण्याची चढाओढ आणि त्यातून येणारा एकाकीपणा यांमुळे ‘जेन झी’चा मानसिक ताण वाढला आहे. अशावेळी त्यांच्यासाठी कुणाकडेही व्यक्त न होता मोकळेपणाने जगता येईल असे हक्काचे ठिकाण म्हणजे पाळीव प्राणी ठरत आहेत.
‘मैत्री’ म्हटले की शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमधील सवंगडी आठवतात; पण 'जेन झी'ची घट्ट मैत्री घराघरांतील पाळीव प्राण्यांशी फुलताना दिसते. मानवी नात्यांत अपेक्षा, मतभेद किंवा काही मर्यादा असतात; परंतु कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत तसे नसते. आपले बँक बॅलन्स, कपडेलत्ते, कामधंदा या कशाशीही त्यांना देणे-घेणे नसते. घरी पाऊल ठेवताच शेपूट हलवत किंवा ‘म्याऊ’ करत धावत येणारे प्राणी जो आनंद देतो, तो अतुलनीय असतो. मन हलके करण्यासाठी नेहमी शब्दांचीच गरज नसते. पाळीव प्राणी शांतपणे जवळ बसून देत असलेला दिलासा मानसोपचारतज्ज्ञापेक्षा कमी नसतो.
पेट पेरेंटस्
‘जेन झी’साठी हे प्राणी केवळ ‘पाळीव’ राहिलेले नाहीत. कुटुंबाचे अविभाज्य सदस्य बनले आहेत. यातूनच आजकाल ‘पेट पेरेंटस्' ही नवी संकल्पना रूढ झाली आहे. सोशल मीडियावर तरुण-तरुणी आपल्या पेटस्चे मजेशीर आणि क्यूट व्हिडीओ शेअर करताना दिसतात. ही मैत्री केवळ घरापुरती मर्यादित न राहता सोशल मीडियावरही अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.
संगीतही एक मित्र
संगीतात हृदयाचे तार छेडण्याची क्षमता असते, हे सर्वश्रुत आहे. आता ‘जेन झी’ संगीतातूनही तणाव कमी करण्याचा प्रयत्न करते. विशेषतः पॉप आणि कोरियन संगीत कॉलेज पिढीत लोकप्रिय आहे.