

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने भाजपच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा पुन्हा पक्षीय राजकारणात सक्रिय होणार आहेत. 4 जुलैरोजी सरकारविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्या विरोधात पक्षांतूनच टीका होत आहेत. भाजपच्याच काही नेत्यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. यातून अद्याप विरोधी पक्ष नेत्याची निवडदेखील झालेली नाही. परिणामी पक्षात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून यावर उपाय म्हणून माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा हे सक्रिय होणार आहेत. पक्षाच्या कार्यालयात पक्ष संघटना आणि इतर विषयावर आयोजित बैठकीत सहभाग घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांबरोबर बोलताना पक्षीय राजकारणात सक्रिय होण्याची माहिती दिली. त्याचबरोबर राज्य सरकारच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, या मागणीसाठी 4 जुलैला विधानसौध येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय धरणे सत्याग्रह करणार असल्याचे सांगितले.
भाजपचे आमदार अधिवेशनात आवाज उठविणार आहे. मी कार्यकर्त्यांसमवेत गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहे. भाजपने निवडणूकपूर्व काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. 10 किलो तांदूळ द्यावा. बेरोजगार पदवीधरांना 3 हजार भत्ता, डिप्लोमाधारकांना 1500 रु. भत्ता व 200 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा करावा, या मागण्या आम्ही करणार असल्याचे येडियुराप्पा यांनी सांगितले.