बेळगाव : एकीकडे हलगा-मच्छे बायपाससाठी 100 टक्के भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे, लवकरच काम पूर्ण करण्यात येणार आहे, असा दावा करणार्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकर्यांना तुमची नुकसानभरपाई घेऊन जावी, अशी नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, संभ्रम निर्माण झाला आहे. बायपासबाबत झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय काम करता येत नसल्याने नोटीशीला किंमत नाही, असा दावा वकिलांनी केला आहे.
हलगा-मच्छे बायपासबाबत शेतकर्यांनी न्यायालयात दावा केला आहे. उच्च न्यायालयाने बायपासच्या झिरो पॉईंटबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार हा दावा सुरु आहे. तरीही प्रशासन पोलिसी बळावर हा रस्ता करत आहे. हा रस्ता करताना शेतकर्यांनी भरपाई घेतली आहे, असा दावा जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि खासदारांनी वारंवार केली आहे. पण, शेतकरी न्यायालयीन लढा देत असतानाच आता पुन्हा अनेक शेतकर्यांनी भरपाई घेऊन जावी, अशी नोटीस बजावण्यात येत आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.
याबाबत न्यायालयात शेतकर्यांची बाजू मांडणारे वकील रविकुमार गोकाककर यांनी बायपासचा दावा न्यायालयात आहे. झिरो पॉईंटशिवाय रस्ता करता येत नाही. पण, प्रशासन बेकायदेशीरपणे काम करत असल्याचा आरोप केला आहे. आता शेतकर्यांना भरपाईसाठी नोटीसा पाठवल्या असल्या तरी शेतकर्यांची बाजू मजबूत आहे. त्यामुळे, या दाव्यात शेतकर्यांना नक्कीच न्याय मिळणार आहे, असे सांगितले आहे.