

जमखंडी, अथणी : बेळगाव व बागलकोट जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कृष्णा नदीवरील हिप्परगी जलाशयाचा एक दरवाजा मोडून (क्रमांक 22) हजारो लिटर पाणी वाहून गेले. घटनास्थळी पाटबंधारे व पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी दाखल होऊन दुरुस्ती कामासाठी परिश्रम घेत आहेत. पण अद्याप यश आले नसल्याने हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.
बागलकोट जिल्हा पालक व अबकारी खात्याचे मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी हिप्परगीला भेट देऊन पाहणी केली. त्वरित दुरूस्ती करून नवे गेट बसवण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच कोणीही भीती बाळगू नये, असे आवाहन केले. कृष्णा नदीवर बांधलेल्या हिप्परगी जलाशयाची एकूण क्षमता 6 टीएमसी आहे. बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील प्रमुख शहरे आणि गावांसाठी हे जलाशय शेतीला आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरले आहे. आता मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जात असल्यामुळे नागरिकांना चिंता लागून राहिली आहे.
सध्या पाण्याची पातळी कमी होत असल्याने सर्व दरवाजे बंद केले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे दोन दरवाजे खुले झाल्याने एक टीएमसी पाणी कमी होण्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे रात्रभर एक टीएमसी पाणी कमी होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने लवकरच गेट बसण्याचीही शक्यता आहे. धरणाचे काम पूर्ण होऊन 25 वर्षे झाली आहेत. दरवाजा गंजले असल्याने पाण्याच्या दबावाने गेट नं. 22 खुले झाले. दरवाजा बसविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती धरण कार्यालयातून देण्यात आली. बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील रबकवी-बनहट्टी, जमखंडी, तेरदाळ, अथणी, कागवाड, रायबागसह अनेक तालुक्यांच्या प्रशासनाला उन्हाळ्यात पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता आहे.