

बेळगाव : महामार्गावर भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार चारवेळा उलटून एकजण जागीच ठार झाला, तर कारमधील अन्य तिघेजण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळी ब्रीजजवळ शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. कार भूतरामहट्टीकडून बेळगावकडे येत होती.
प्रणव चंद्रकांत संभाजीचे (वय 24, मूळ रा. चव्हाट गल्ली, सध्या रा. महावीर कॉलनी, मारुतीनगर, बेळगाव) असे मृृताचे नाव आहे. आर्याश्री अनुराग रंजन (वय 23, मूळ रा. बिहार, सध्या केएलई एमबीबीएस विद्यार्थिनी), इतेश सदानंद अरोस्कर (वय 25, रा. ब्रह्मनगर, पिरनवाडी) व श्रीलक्ष्मी राजेश येलीगार (वय 23, रा. वैभवनगर) हे जखमी आहेत.
काकती पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपरोक्त चौघेजण जेवणासाठी हत्तरगीकडे गेले होते. इतेश कार चालवत होता. परतताना बेन्नाळी पुलाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून महामार्गावर उलटली. पाठीमागे बसलेला प्रणव हा कारखाली सापडून जागीच ठार झाला, तर उर्वरित तिघेजण किरकोळ जखमी झाले. काकतीचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या शवागरात मृत तरुणाची उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चव्हाट गल्ली स्मशानभूमीत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेन्नाळीत घडलेला अपघात हा बेळगाव परिसरात दोन दिवसांत घडलेला दुसरा कार अपघात आहे. बुधवारी रात्री कॅम्पमधील शरकत पार्कजवळ घडलेल्या कार अपघातात सज्जाद सुभेदार (वय 28, शाहूनगर-बेळगाव) या युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. शरकत पार्कजवळील वळणावर भरधाव कारने धडक दिल्याने सज्जादचा मृत्यू झाला. तो मित्राच्या दुचाकीवर मागे बसला होता. कारच्या धडकेने तो रस्त्यावर उडून पडला.
खासगी कंपनीचा कर्मचारी असलेला सज्जाद घरातून काम करत होता. पुढच्याच महिन्यात त्याचा विवाह होणार होता. अपघातात त्याचा मित्र साजिद मन्निकेरी जखमी झाला. अपघातानंतर सज्जादला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग झाला नाही. अज्ञात कारचालकावर गुन्हा नोंद झाला आहे.