

बंगळूर : राज्यसभा निवडणुकीत माजी पंतप्रधान देवेगौडा यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. देवेगौडा यांनी उमेदवारीची मागणी केली होती, परंतु भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. हा त्यांचा अपमान केला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर केंद्रीय मंत्री असलेले निजद नेते कुमारस्वामी यांनी त्यांच्या वडिलांनी उमेदवारी मागितलीच नव्हती. मग अपमानाचा प्रश्नच कुठे येतो? असे प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपकडून देवेगौडा यांचा सातत्याने अपमान केला जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार जी. एस. बसवराज यांनी देवेगौडा यांचा पराभव केला होता. मात्र, सोनिया गांधी यांनी विशेष काळजी घेऊन त्यांना राज्यसभेवर निवडून आणले. कुमारस्वामी आपले केंद्रीय मंत्रीपद टिकवून ठेवण्यासाठी हा अपमान सहन करत आहेत. भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकीट नाकारून पुन्हा एकदा देवेगौडा यांचा अपमान केला आहे, असे एआयसीसीचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
यावर तीव्र प्रतिक्रिया देताना कुमारस्वामी म्हणाले, देवेगौडा यांच्याबद्दल काँग्रेसजनांमध्ये आता प्रेम आणि सहानुभूती निर्माण झाली आहे. काँग्रेसने माझ्या वडिलांना त्यांच्या राजकीय जीवनात कशी वागणूक दिली आहे, हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आणि भाजपच्या युतीमुळे काँग्रेसजनांमध्ये सहानुभूतीपेक्षा जास्त भीती निर्माण झाली आहे, असे त्यांनी उपहासाने सांगितले.
काँग्रेस पक्षात होत असलेल्या घडामोडी आणि अपयश झाकण्यासाठी देवेगौडा यांना निमित्त बनवून राजकारण करत आहे. देवेगौडा यांनी राज्यसभेच्या उमेदवारी मागितली नाही. देवेगौडा यांचे आयुष्य संघर्षमय आहे. ते सत्तेसाठी हपापलेले नाहीत. आत्मसन्मानाला धक्का लागल्यावर त्यांनी पंतप्रधानपद सोडले. काँग्रेस पक्षाला हे सर्व माहीत नाही का, असा सवाल त्यांनी केला.
विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणुका होत आहेत. आम्ही निजदचा उमेदवार उभा केला आहे. आमच्याकडे दोन मतांची कमतरता आहे. काँग्रेसच्या पाचव्या उमेदवाराकडेही दोन मतांची कमतरता आहे. या निवडणुकीत कोणतेही डावपेच नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही भाजपमधून हकालपट्टी झालेल्या बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे मत मागणार आहोत. काँग्रेसकडे पैशाची ताकद आहे. पुढे काय होतं ते पाहूया, असे ते म्हणाले..