

खानापूर : गवाळीतील (ता. खानापूर) शाळेत मुख्याध्यापकांच्या टेबलवरच सापाने ठिय्या मांडल्याची घटना ताजी असताना गुंजी सरकारी शाळेच्या आवारात आठ दिवसांत चारवेळा अस्वलाचे दर्शन झाल्याने विद्यार्थ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावातील शाळेच्या परिसरातच अस्वलाच्या वावराने खळबळ उडाली आहे. शिक्षकांनी अस्वलाच्या भितीने ‘तुमच्या मुलांना शाळेच्या वेळेतच पाठवा. वेळेपूर्वी पाठवू नका, तुम्ही स्वतः मुलांना शाळेत सोडा,’ असा संदेश पालकांच्या मोबाईलवर पाठविला आहे. जंगली श्वापदांनी तालुक्याच्या विविध भागात थैमान मांडले आहे. अस्वलांनी तर तालुकावासियांचे जगणे मुश्किल केले आहे.
शाळेजवळच्या हनुमान मंदिरात अस्वल दिसल्यानंतर ग्रामस्थांत भितीचे वातावरण आहे. शाळेच्या परिसरातही अस्वलांचा नेहमीच वावर असल्याचे आढळून आले आहे. त्याबद्दल गावात चर्चा होत असली तरी ग्रामस्थांनी काहीच हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे, शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसभर शाळेतच कोंडून ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.
गेल्या आठवडाभरापासून दोन अस्वलांचा शाळा परिसरात वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. अस्वल शाळेजवळच्या हनुमान मंदिरात वास्तव्य करून होते. ते काही ग्रामस्थांनी पाहिले आहे. पण, याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही, असे पालकांचे म्हणणे आहे.
आधीच शाळा इमारतीला गळती लागून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतांना ही नवीच समस्या उभी ठाकली आहे.