धावे : चोर्ला घाट माथ्यावरील कर्नाटक सरकारच्या अबकारी चेक पोस्टजवळच्या चौके या गावातील शेतकरी दशरथ वरांडेकर बुधवारी पहाटे अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी पहाटे आपल्या गोठ्यातून गुरांना सोडून जंगलात चरण्यासाठी घेऊन वरांडेकर निघाले होते; मात्र वाटेतच जंगलात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात अस्वलाने त्यांच्या चेहर्यावर गंभीर दुखापत केली. खानापूर वनविभाग, पोलिस खाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केलेला आहे. सध्या फणसाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे जंगलातील अस्वले ही प्रामुख्याने फणस खाण्यासाठी लोकवस्तीच्या दिशेने येतात व अशावेळी कुणी मनुष्य त्यांच्या नजरेस पडल्यास ते त्यांच्यावर हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी चिगुळे या ठिकाणीही असाच एका शेतकर्यावर हल्ला केला होता. अस्वलाच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
कर्नाटक सरकारचा अबकारी खात्याचा तपासणी नाका गावाजवळच आहे. रात्रंदिवस या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते. यावेळी वाहनांतील प्रवासी खाली उतरतात. त्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो, अशी भीती कणकुंबी, सुर्ला ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रश्नी वन विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.