

बेळगाव : तब्बल 112 कोटींचे बनावट इनव्हॉईस बनवून 21 कोटी 64 लाख रुपयांचा जीएसटी बुडवणार्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. महंमद सकलेन असे त्यांचे नाव आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या बेळगाव झोनल विभागाने ही कारवाई केली.
महंमद सकलेन यांची दावणगेरी जिल्ह्यातील हरिहर येथे मे. मरीयम स्क्रॅप डिलर्स नावाची स्क्रॅप मेटल कंपनी आहे. या कंपनीने गेल्या काही महिन्यांपासून बनावट इनव्हॉईस तयार करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या कंपनीची कागदपत्रे तपासताना जीएसटी विभागाला काळाबाजार आढळला. त्यांनी सखोल तपास सुरू केला असता, या कंपनीने सुमारे 112 कोटींचे बनावट इनव्हॉईस तयार केल्याचे आढळून आले. याद्वारे त्यांनी 17 कोटी 14 लाखांचा आयटीसी (इनपूट टॅक्स क्रेडिट) चुकवला, शिवाय दंडाची साडेचार कोटींची रक्कमही भरली नाही. त्यामुळे त्यांनी एकूण 21 कोटी 64 लाखांचा वस्तू व सेवा कर चुकवल्याचे तपासात स्पष्ट झाले.
कंपनीने खरेदी केलेल्या सर्व स्क्रॅपचे वितरक व कंपन्या देखील बनावट दाखवण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालय बेळगाव झोनलने कंपनीचे प्रमुख महंमद सकलेन यांना शनिवारी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यांना बेळगाव येथील जेएमएफसी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुढील तपास सुरू असल्याचे पत्रक जीएसटी महासंचालनालयाने प्रसिद्धीस दिले आहे.