

खडकलाट : ग्राम पंचायत हद्दीतील मनोचीवाडी-चिखलव्हाळ क्रॉसजवळ सर्व्हे नं. 187 मधील सुमारे 10 एकर उसाला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत दहा एकरातील ऊस जळून खाक झाला असून सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अजित मायाप्पा गावडे, शंकर मायाप्पा गावडे, परशराम बाबू गावडे व वैशाली अजित गावडे यांचे यामध्ये नुकसान झाले आहे.
शुक्रवारी दुपारी गावडे यांच्या शेतातील उसाला आग लागल्याचे निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी धाव घेतली. शेतकरी शेतात येईपर्यंत उशीर झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. घटनेची माहिती निपाणी नगरपालिका व हालसिद्धनाथ सहकारी सहकारी कारखान्याच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत 10 एकरातील ऊस जळून खाक झाला होता. या घटनेची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.