बेळगाव : बाची परिसरात ग्रेट गॅम्बलिंग

बेळगाव : बाची परिसरात ग्रेट गॅम्बलिंग
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : चंदगड तालुक्याच्या हद्दीत देवरवाडी परिसरातील शेतवडीत चालणारा जुगार आता बेळगाव तालुक्यातील बाची परिसरात जोर धरू लागला आहे. कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील जुगार बंद केल्यानंतर बेळगाव परिसरातील जुगारकिंग आता बेळगावच्या पोलिसांना मॅनेज करून मोठ्या प्रमाणात जुगार भरवत असल्याचे चित्र आहे. एकाही पोलिस अधिकार्‍याकडे कारवाईची धमक नसल्याने सहा महिन्यांपासून बाची परिसरात जुगार फोफावला आहे. ही विषवल्ली उखडून टाकण्यासाठी आता वरिष्ठ अधिकारी पुढाकार घेणार का, हा प्रश्न आहे.

बाची गावापासून काही अंतरावर एक हॉटेल आहे. हॉटेलच्या डाव्या बाजूने कच्च्या रस्त्याने आत गेल्यानंतर एक शेड उभारलेले दिसते. या शेडमध्ये सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत जुगार सुरू असल्याचे समोर आले आहे. राजरोस चालणार्‍या या जुगारामागे आर्थिक व्यवहाराचे गणित असून, त्यामुळेच पोलिसांकडून छापा टाकला जात नसल्याची चर्चा आहे. अगदी वरिष्ठ अधिकार्‍यापासून ठाणा अधिकार्‍यांपर्यंत प्रत्येकाचे हात ओले केले जात असल्यानेच तेथे छापा टाकला जात नसल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा सुमारे सात लाखांची एन्ट्री देऊन येथे जुगार सुरू ठेवल्याचे समोर येत आहे.

असा चालतो जुगार

बाची परिसरात एका छोटेखानी हॉटेलच्या डाव्या बाजूने आत गेल्यानंतर झाडी व शेतवडी आहे. येथे एक शेड आहे. या शेडमध्ये तसेच आसपासच्या शेतीत हा जुगार रंगतो. शेकडो एकरमध्ये कुठेही अड्डा बसतो अन् रोज लाखो रुपयांची उलाढाल होते.
सायंकाळी 4 ते 6 पर्यंत जुगार नेमका कुठे बसणार हे ठरते. त्यानंतर तशी माहिती नेहमीच्या ग्राहकांना दिली जाते. सहा वाजता जुगार सुरू झाला की तो रात्री 12, 1 ते अगदी 3 वाजेपर्यंत रंगतो. बेळगाव शहर व तालुक्यातून 100 हून अधिक लोक जुगार खेळण्यासाठी जात असल्याचे समजते. रात्री सोलार दिवे, चार्जिंग बॅटर्‍या लावून हा रात्रीस खेळ चालतो.

नामांकित व्यक्ती जुगारी

कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्याच्या हद्दीत आधी मोठ्या प्रमाणात जुगार चालायचा. कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड पोलिसांचाही वरदहस्त होता. परंतु, या जुगाराबाबतची तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह मुंबईपर्यंत पोचल्याने या जुगारी अड्ड्यावर कायम महाराष्ट्र पोलिसांची  नजर राहिली. जुगार चंदगड तालुक्यात चालत असला, तरी येथे जाणारे जुगारी मात्र बेळगाव शहर व जिल्ह्यातीलच होते. त्यामुळेच आता जुगार्‍यांनी बेळगावच्या जुगार्‍यांना नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या नव्हे तर बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या म्हणजे काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा जुगार सुरू केला आहे. गेल्या सहा महिन्यांत तो इतका फोफावला आहे की तेथे दररोज जाणारे 100 हून अधिक जुगारी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दररोज लाखो रूपयांची उलाढाल होते.

जुगारकिंग तेच, जागा नवी…

पाच वर्षांपूर्वी 2018 मध्ये बेळगावच्या तत्कालीन कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांनी कुद्रेमानी परिसरातील शेतवडीत जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता. त्यावेळी त्यांनी तब्बल 40 जणांना अटक करून त्यांच्याकडून साडेचार लाखांची रोकड, 44 दुचाकी व 5 कार जप्त केल्या होत्या. बेळगावच्या आजतागायतच्या इतिहासात हा सर्वात मोठा छापा होता. एक महिला अधिकारी असूनही व वरिष्ठ अधिकार्‍यांचा दबाव असूनही तेव्हा सीमा लाटकर यांनी मोजके अधिकारी व पोलिसांसह छापा टाकला होता. या जुगार अड्ड्यांमुळेही अनेकांचे हात ओले होत होते. त्यामुळेही त्यांच्यावर दबाव होता. या छाप्यानंतर तेव्हा काकतीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रमेश गोकाक यांना बळीचा बकरा बनवत निलंबित करण्यात आले होते. कुद्रेमानी येथे जुगार बसवणारी टोळीच पुन्हा बाची येथे सक्रिय झाल्याचे सांगण्यात येते.

हप्ते कुणाकुणाला?

बाची परिसरातील जुगार अड्ड्यावर रोज लाखोंची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. काही अधिकारीही सायंकाळी सहानंतर या अड्ड्यावर जातात. दिवसभर केलेली वरकमाई ते तेथे उधळतात. हा अड्डा विनाअडथळा चालावा, यासाठी पोलिस दलातील काही अधिकार्‍यांना दरमहा सात लाख रुपये पोचवले जातात, अशीही माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा आणि उपायुक्त रोहन जगदीश अशा अधिकार्‍यांना शोधून त्यांना निलंबित करणार का आणि हा अड्डा बंद पाडणार का, असा प्रश्न आहे.

डीसीपी कारवाई करणार?

2018 मध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून सीमा लाटकर यांनी आपली धमक दाखवून दिली होती. एक महिला अधिकारी असूनही त्यांनी दाखवलेल्या त्या धाडसामुळे त्यांना लेडी सिंघम म्हटले जायचे. आताचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश हेदेखील नव्या दमाचे, नव्या रक्ताचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी मनात आणले तर हा जुगार अड्डा बंद होऊ शकतो. परंतु, ते तसे धाडस दाखवून कारवाई करणार का? हे पहावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news