

निपाणी : शिरगुप्पी रोड पांगिरे (बी) हद्दीतील जाधव बंधू यांच्या घरात भाडोत्री राहत असलेल्या गॅस एजन्सी कर्मचार्यांच्या घरातच पाच किलो गॅस टाकीचा अचानक स्फोट झाल्याने घराचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दोघा कर्मचार्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची नोंद निपाणी अग्निशामक दलात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पांगिरे (बी) येथील? ? राहुल जाधव यांच्या घरी भाडोत्री म्हणून गॅस एजन्सीमध्ये काम करणारे राजस्थान येथील कर्मचारी शामसुंदर व मांडीलाल हे दोघे राहतात. रविवारी शामसुंदर घरातील पाच किलो टाकीच्या आधारे गॅसवर पाणी गरम असताना या टाकीचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे पत्र्यांसह प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. शिवाय स्लॅबलाही तडे गेले. तसेच शेजारी राहत असलेले घरमालक जाधव यांच्या घराचे नुकसान झाले. आगीची घटना लक्षात येताच याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली.
त्यानुसार अग्निशामक दलाचे निरीक्षक वाय. बी. कौजलगी, उदय पट्टण, कर्मचारी डी. एल. कोरे, बी. के. दोनवाडे, जे. डी. कमते, विशाल पुजारी यांनी बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले.
शामसुंदर व मांडीलाल हे येथील गॅस एजन्सीकडे गॅस रिपेरी व सर्व्हिसिंगची कामे करतात. दरम्यान परिसरात पुरवठा करण्यासाठी काही गॅस टाक्या त्यांनी आपल्या घरी ठेवल्या होत्या. स्फोट घडताच शिताफीने दोघांनी नागरिकांच्या मदतीने घरात असलेल्या टाक्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.