

बेळगाव : गँगवाडी येथील समिती शाळेसमोरील एका झोपडपट्टीमध्ये घरगुती सिलिंडरला गळती लागून त्याचा स्फोट झाल्याची घटना गुरुवार दि. 11 रोजी दुपारी घडली. या घटनेत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. केवळ सुदैवानेच या घरातील सर्वजण बचावले आहेत.
गँगवाडी येथील एका घरामध्ये गॅसला गळती लागली. सदर गळती घरातील लोकांच्या लक्षात आली नाही. शेगडी पेटवण्यासाठी गेले असता अचानक भडका उडाला. या घटनेनंतर घरातील सर्वजण बाहेर पडले. बाहेर पडताना वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली आहे.
अचानक आगीने भडका घेतला. त्यानंतर काहीजणांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणली. या घटनेत घरातील सर्व साहित्य जळाले आहे. माळमारुती पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.