

बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी चिकोडी मतदारसंघातून आमदार गणेश हुक्केरी यांनी बुधवारी (दि. 8) उमेदवारी अर्ज दाखल केला. तर हुक्केरी मतदारसंघातून माजी खासदार रमेश कत्ती यांनी पुन्हा एकदा आपल्या 52 पीकेपीएस मतदारांना सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
आमदार हुक्केरी यांनी चिकोडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अर्ज दाखल करताना त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी यांनी आपण शेतकर्यांच्या हितासाठी काम करणार आहे, असे सांगितले. आमदार हुक्केरी यांच्या अर्जामुळे आतापर्यंत एकूण उमेदवारांचे 12 अर्ज दाखल झाले. त्यामध्ये माजी खासदार कत्ती आणि कुश कत्ती यांचे प्रत्येकी दोन अर्ज आहेत.
डीसीसी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात माजी खासदार कत्ती यांनी 52 समर्थक मतदारांसह अर्ज दाखल करुन आपली ताकद दाखवून दिली. विशेष म्हणजे, मंगळवारीच आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हुक्केरी मतदारसंघातील 42 मतदारांच्या पाठिंब्याने राजेंद्र पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर माजी खासदार कत्ती यांनी केलेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले.
माझ्या पाठीशी असलेल्या 52 सदस्यांना सोबत घेऊन मी दुसर्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. डीसीसी बँकेचे मध्यवर्ती कार्यालय पाहण्याची इच्छा असलेल्या मतदारांनाही मी सोबत आणले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघाचे नेतृत्व मी करणार नाही. संबंधित तालुक्यांतील नेत्यांनी विचारविनिमय करुन जो निर्णय घेतला असेल, त्याला माझा पाठिंबा असेल. समविचारी लोकांनी एकत्र येऊन हातमिळवणी केल्यास बँकेच्या हितासाठीच मी वाटचाल करीन, असे माजी खासदार कत्ती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.