

कंग्राळी खुर्द : ग्राम पंचायत कार्यालय उद्घाटनावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले नाही. हा त्यांचा अवमान झाला आहे, असा आरोप करत मंगळवारी (दि. 30) दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले. त्यावर पंचायतीने सदर घटना अनावधानाने झाली असून पीडीओना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे तालुका पंचायत अधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर, आमदार राजू सेट, आमदार चन्नराज हट्टीहोळी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 29) ग्राम पंचायत नूतन कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी लक्ष्मी-सरस्वती, बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोंचे पूजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पूजनावेळी लावायचा राहून गेला. त्यामुळे दलित संघटना पदाधिकारी सिद्राय मेत्री, रवी बस्तवाडकर त्यांच्या समवेत गावातील आंबेडकर मंडळाचे पदाधिकारी आ़णि कार्यकर्त्यांनी कार्यलयासमोर डॉ. आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून कार्यालयाला टाळे ठोकले.
लोकप्रतिनिधींच्या विरोधात विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दिवसभर आंदोलन छेडले. यावेळी पीडीओ, काही जेष्ठ सदस्य यांनी घडलेल्या घटनेबद्दल माफी मागितली. पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे तालुका पंचायत अधिकारी प्रदीप सावंत, बसवंत कडेमणी आदींनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. शेवटी पीडीओांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.