

कारवार; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार किनारपट्टीवर बुधवारी दुपारच्या सुमारास एक स्थलांतरित समुद्री पक्षी आढळून आला. या पक्ष्याच्या अंगावर चिनी बनावटीचे जीपीएस ट्रॅकिंग उपकरण बसविण्यात आलेले होते. भारतीय नौदलाच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘आयएनएस कदंब’ तळाजवळ हा पक्षी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची स्थानिक पोलिसांसह वन विभाग आणि नौदल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारवारच्या किनारपट्टीवर बुधवारी दुपारच्या सुमारास एक पक्षी जखमी अवस्थेत पडून होता. त्याच्या पाठीवर जीपीएस ट्रॅकिंग उपकरण बसविण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार पोलिसांनी या पक्ष्याला ताब्यात घेऊन त्याला वन विभागाकडे सुपूर्द केले. वन अधिकार्यांनी पक्ष्याच्या अंगावर लावलेले उपकरण तपासले असता त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक युनिट आणि लहान सोलर पॅनेल असल्याचे आढळून आले.
उपकरणावरील चिठ्ठीवर ई-मेल
धक्कादायक म्हणजे त्याच्या अंगावर बसविण्यात आलेल्या उपकरणाला एक चिठ्ठी जोडलेली होती. यावर एक ई-मेल आयडी लिहिलेला होता. हा पक्षी कुणालाही सापडल्यास त्याने दिलेल्या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत नमूद केलेला होता. पोलिसांनी या ई-मेलची तपासणी केली असता तो बीजिंगमधील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत असलेल्या रिसर्च सेंटर फॉर इको एन्व्हायर्न्मेंटल सायन्सेस या संस्थेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतीय अधिकारी या ई-मेल आयडीवर संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ही घटना अत्यंत संवेदनशील
अधिकार्यांनी स्पष्ट केले की, ही घटना अत्यंत संवेदनशील आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरात घडल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. समुद्री पक्षी ज्या ठिकाणी सापडला, ते आयएनएस कदंबा नौदल तळाजवळ आहे. हा तळ भारतीय नौदलाच्या सर्वात महत्त्वाच्या तळांपैकी एक असून येथे विमानवाहू युद्धनौका आणि पाणबुड्यांसह अनेक महत्त्वाच्या युद्धनौका तैनात आहेत. आयएनएस कदंबाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर तो पूर्व गोलार्धातील सर्वात मोठा नौदल तळ ठरणार आहे. यामुळे संशोधनाच्या नावाखाली संवेदनशील माहिती बाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व बाबी तपासल्या जात आहेत. चिनी संशोधन संस्थेकडून मिळणार्या प्रतिसादानंतर आणि उपकरणाच्या डेटा ट्रान्समिशन क्षमतेच्या तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या उपकरणाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून इतर कोणतीही शक्यता पूर्णपणे फेटाळण्यासाठी सखोल पडताळणी केली जाणार आहे.
यापूर्वीही घडल्या अनेक घटना
कारवार परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. 2024 मध्ये बैठकोल बंदर परिसरात ट्रॅकिंग उपकरण लावलेला एक गरुड आढळून आला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबई पोलिसांनी आठ महिने ताब्यात ठेवलेला संशयित ‘चिनी हेर’ कबुतराची सुटका केली होती. मे 2023 मध्ये चेंबूरमधील पीर पाव जेटी येथे पकडलेल्या या कबुतराच्या पायाला दोन रिंग्ज बांधलेल्या होत्या आणि पंखांवर चिनी भाषेत संदेश लिहिलेला दिसत होता. याआधी 2020 मध्ये काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानमधून आलेले एक कबुतर पकडले होते. त्याच्या पायाला उर्दू-पाकिस्तानी भाषेतील एक चिठ्ठी बांधण्यात आली होती. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारी चिठ्ठी एका कबुतराच्या पायाला बांधलेली सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षा यंत्रणांनी कबुतराला ताब्यात घेतले होते.