

बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जय किसान खासगी भाजी मार्केट-एपीएमसी वादात अखेर मंगळवारी एका शेतकर्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाडावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तो जखमी असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकार्यांनी रुग्णालयात त्याची भेट घेतली असून, तातडीच्या उपचारांचे आदेश दिले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तर त्याआधी सोमवारी रात्री जय किसान मार्केट संघटना आणि एपीएमसी अधिकार्यांमध्ये वादावादी आणि अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्याबद्दल मार्केट पोलिस स्थानकांत दोन तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी आवारात मंगळवारी शेतकरी ठिय्या मांडून बसले होते. खासगी मार्केट बंद करावे, अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी शेतकर्यांना सायंकाळ पाचपर्यंत कार्यवाहीची ग्वाही दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी जय किसान मार्केटच्या पदाधिकार्यांशी केपीटीसीएल सभागृहात चर्चा सुरू होती. ती लांबल्याने पाचची मुदत टळून दोन तास झाल्यानंतर शेतकर्याने झाडावरून उडी घेतली.
शंकर रामाप्पा माळी (वय 35, रा. कटभावी, ता. रायबाग) असे त्याचे नावव आहे. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले.
शेतकर्यांनी सायंकाळी कोर्ट आवाराच्या रस्त्यावर एक तास रास्ता रोको केला. शेतकरी रस्त्यावर ठान मांडून बसले होते. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक मार्ग अन्य मार्गाने वळविली. अखेर जिल्हाधिकारी दाखल झाल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
सोमवारी रात्री जय किसान भाजी मार्केट बंद करण्याचा आदेश घेऊन एपीएमसीचे सचिव विश्वनाथ रेड्डी मार्केटकडे गेले होते. परंतु, तेथे त्यांच्यात आणि जय किसान व्यापार्यांमध्ये वादावादी झाली. मी आदेश देण्यासाठी जय किसानकडे आलो, असे रेड्डी म्हणत होते. तर तुम्ही आदेशाची प्रत द्या, पण शेतकर्यांच्या मालगाड्या थांबवणे, त्या दुसरीकडे वळवणे हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे जय किसानचे व्यापारी विचारत होते. बराच वेळ हा वाद सुरु होता. त्यानंतर एकमेकांना ढकलाढकलीही झाली.
त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचे सांगत रेड्डी यांनी मार्केट पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार काही व्यापार्यांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. आणखी एक एफआयआर शेतकर्यांनी दिला आहे. जय किसान भाजी मार्केटमधील काही व्यापार्यांनी आपल्याकडून अधिक कमिशन घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार माळमारुती पोलिसांनी हाही एफआयआरही दाखल करुन घेतला आहे. दोन्ही एफआयआर दाखल करून घेत पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.
जिल्हाधिकारी आणि जय किसान खासगी मार्केट असोसिएशनची बैठक केपीटीसीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी बैठक झाली. जिल्हा पोलिस प्रमुख भूषण बोरसे, डीसीपी नारायण बरमणी, आमदार राजू सेट, एपीएमसी सचिव विश्वनाथ रेड्डी, अॅड. संजय पाटील, दिवाकर पाटील, संजय भोसले, मोहन मन्नोळकर, मोहमंदइकबाल डोणी, विश्वनाथ पाटील, गुरूप्रसाद आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रोशन म्हणाले, जय किसान भाजी मार्केटला परवानगी देताना काही अटी घातल्या होत्या. मात्र शेतकर्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे राज्याच्या कृषी पणन विभागाच्या अधिकार्यांनी जय किसानचा खरेदी-विक्री परवाना रद्द केला आहे. आता जय किसान भाजी मार्केट मधील व्यापार्यांनी एपीएमसीत खरेदी-विक्री सुरू करावी.
जिल्ह्यातील शेतकर्यांनी एपीएमसीत शेतीमाल घेऊन जावा. शेतकर्यांना सर्व सुविधा द्याव्यात. शेतकर्यांना पाणी, शौचालय आदी सुविधा दिल्या जाव्यात. पुन्हा कोणत्याही शेतकर्यांकडून तक्रार येता कामा नये, असे जिल्हाधिकर्यांनी एपीएमसीच्या अधिकार्यांना बजावले आहे.
जय किसान भाजी मार्केटमध्ये आदेशानुसार आम्ही भाजी खरेदी-विक्री बंद ठेवू. शेतकर्यांनाही कळवू. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. जिल्हाधिकार्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. मात्र आम्ही एपीएमसीत जाणार नाही. आम्ही न्यायालयीन लढा देणार आहे.
सुनिल भोसले, संचालक, जय किसान भाजी मार्केट