

Yernal Farmer Death
निपाणी : उंदर पूजेनिमित्त आपल्या शेतात घुगऱ्या टाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विद्युत भारित तुटलेल्या तारेचा शॉक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामचंद्र शंकर संकपाळ (वय ७० रा. यरनाळ ता. निपाणी) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गणेशोत्सव काळात उंदर पूजा ग्राह्य मानली जाते. त्यानुसार रामचंद्र संकपाळ हे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास आपल्या मालकीच्या आशामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारातील शेतात उंदर पूजेनिमित्त केलेल्या घुगऱ्या टाकण्यासाठी गेले होते.
या दरम्यान ते उसाच्या शेतात आतमध्ये गेले होते. यावेळी तुटून लोंबकळत असणारी विद्युत भारित तार त्यांना दिसली नाही. दरम्यान या विद्युत भारीत तारेचा रामचंद्र संकपाळ यांच्या गळ्याला स्पर्श झाल्याने ते जागीच मृतावस्थेत कोसळले.
दरम्यान दुपारी शेतावर गेलेले रामचंद्र संकपाळ हे बराच उशीर झाला तरी घराकडे न परतल्याने त्यांचा कुटुंबियांसह नातेवाईक व मित्रपरिवारांनी इतरत्र शोध घेतला.मात्र ते मिळून आले नाहीत. दरम्यान रविवारी सकाळी सहाच्या सुमारास पुन्हा त्यांचा आशामी शिवारात शोध चालवला. यावेळी काहीजणांच्या लक्षात तुटलेली तार दिसून आली. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित करून त्यांच्या उसाच्या शेतात शोध घेतला असता संकपाळ हे ऊस पिकाच्या सरीत मृतावस्थेत आढळून आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयासह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
दरम्यान याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार पी. एम. गस्ती यांच्यासह हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत मयत रामचंद्र संकपाळ यांचा मुलगा प्रदीप संकपाळ यांनी रितसर फिर्याद नोंदवली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रामचंद्र संकपाळ हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतावर गेले होते. दरम्यान त्यांच्या उसाच्या शेतातून गेलेल्या दोन विद्युत खांबांच्यामधील विद्युत भारित तार तुटून लोंबकळत पडली होती. हे त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे या सर्व घटनेला हेस्कॉम (विज मंडळ) च जबाबदार आहे. कारण वेळीच सदर विद्युत भारीत लोंबकळत असलेल्या तारेचा बंदोबस्त हेस्कॉमकडून झाला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. त्यामुळे संकपाळ कुटुंबियांना हेस्कॉमकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.