

बेळगाव : नऊ वर्षांपूर्वी आपल्या योग सेंटरमध्ये येऊन उपचार घेतले; परंतु यावेळी आपल्याकडे असलेल्या यंत्रोपकरणाची न सांगता छायाचित्रे घेऊन तसेच यंत्रोपकरण तयार केले. त्याद्वारे आता दुसरीकडे योग सेंटर सुरू केल्याचा आरोप करत महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार टिळकवाडी पोलिसांनी पाचजणांविरोधात एफआयआर दाखल करून घेतला आहे.
याबाबत माहिती अशी की, उषा अभय केस्ते (वय 51, रा. भाग्यनगर, सातवा क्रॉस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. यामध्ये राजाराम बाचीकर (रा. संतमीरा रोड, अनगोळ), राजू कोतंबीरकर (रा. कपिलेश्वर मंदिरजवळ), मोहन खांडेकर (भाग्यनगर, सातवा क्रॉस), मोहन लाड (भाग्यनगर, सातवा क्रॉस) व गुरुप्रसाद पावस्कर (रा. गणेश मंदिरजवळ, हिंदवाडी) यांचा समावेश आहे.
उषा केस्ते यांनी दिलेल्य फिर्यादीत म्हटले आहे की, त्या योग सहाय्यक म्हणून काम पाहतात. सन 2016 मध्ये काहीजण त्यांच्याकडे योग उपचार करून घेण्यासाठी गेले. त्यांनी उपचार करून घेतले. ज्या यंत्रोपकरणावर त्यांनी उपचार करून घेतले. ते चांगले असल्याचे लक्षात आल्यानंतर उपरोक्त संशयितांनी त्या यंत्रोपकरणाची लांबी, रूंदी व अन्य माहिती घेतली. आम्ही हे यंत्रोपकरण 20 वर्षे अभ्यास, अध्ययन करून बनवले आहे.
परंतु, या संशयितांनी या यंत्रोपकरणासारखेच बनावट यंत्रोपकरण बनवून स्वतःच भाग्यनगर दुसरा क्रॉस येथे 18 जुलै 2025 पासून योग हेल्थ फिटनेस सेंटर सुरू केले आहे. आपल्या यंत्रासारखेच बनावट यंत्र बनवून आपली फसवणूक व विश्वासघात केल्याचा आरोप उषा केस्ते यांनी केला आहे. त्यानुसार टिळकवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून निरीक्षक परशुराम पुजेरी तपास करत आहेत.