

Bengaluru Vidhana Soudha Bomb Threat
काशिनाथ सुळकुडे
कर्नाटक : बेंगळुरू येथील कर्नाटक राज्याच्या सर्वोच्च सुरक्षा क्षेत्रातील 'विधानसौध' (मंत्रालय) बॉम्बने उडवून दिल्याचा बनावट (AI-generated) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पसरल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. दसरा सणाच्या मुहूर्तावर समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा खोडसाळ प्रकार करण्यात आला आहे.
इन्स्टाग्रामवर 'Jnx king Hg' नावाच्या युजरने हा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. विधानसौधच्या इमारतीचे चित्रीकरण करून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून ती इमारत बॉम्बने उडवून दिल्याचा अत्यंत नजीकचा आणि खरा भासणारा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
या व्हिडिओला “मी विधानसौध बॉम्बने उडवून दिला आहे” अशी कॅप्शन लिहून या तरुणाने सोशल मीडियावर स्वतःला दहशतवादी असल्यासारखे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
सणाच्या वातावरणात अशा प्रकारे सार्वजनिक शांतता धोक्यात आणणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या या व्हिडिओमागचा हेतू नेमका काय, असा सवाल करत नेटकरी तीव्र रोष व्यक्त करत आहेत. या व्हायरल पोस्टवर अनेक संतापलेल्या नागरिकांनी आणि युजर्सनी बंगळुरू पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलला टॅग केले आहे.
राज्याच्या अतिसंवेदनशील आणि सुरक्षित इमारतीला अशा प्रकारे खोट्या धमक्या देणाऱ्या व दहशत पसरवणाऱ्या या विकृत तरुणावर लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.