

खानापूर : गेल्या दीड महिन्यापासून आंबोळी, निलावडे, बांदेकरवाडा परिसरात तळ ठोकून असलेल्या हत्तींच्या कळपात नववर्षात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. गर्भवती असलेल्या हत्तीणीने उसाच्या शिवारालगत पिलाला जन्म दिला आहे. त्यामुळे, कळपातील सदस्यांची संख्या एकने वाढली आहे. पिलाच्या सुरक्षेसाठी हत्तींकडून अधिक आक्रमकता आणि दक्षता बाळगली जात असल्याचे वनखात्याला दिसून आले आहे.
वनखात्याच्या माहितीनुसार कळपात दहा हत्तींचा समावेश आहे. त्यापैकी सहा हत्ती आंबोळी, निलावडे, बांदेकरवाडा, मुघवडे या परिसरात तळ ठोकून आहेत. तर चार हत्ती कळपातून बाजूला झाले असून ते देवाचीहट्टी, कुसमळी, ओलमणी परिसरात फिरत आहेत. आंबोळी परिसरातील सहा हत्तींच्या कळपातील हत्तीणीने नुकताच एका पिल्लाला जन्म दिला आहे. वन खात्याचे पथक या कळपाच्या मागावर आहे. लोकांचा हत्तीच्या कळपाशी सामना होऊन अघटीत होण्याची शक्यता आहे. हा धोका गृहीत धरुन वन खात्याची वेगवेगळी पथके चोवीस तास त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. यापैकी एका पथकाला आंबोळीजवळील शिवारात नुकतेच जन्मलेले हत्तीचे पिल्लू दिसून आले आहे.
खाद्यासाठी बाहेर फिरताना या पिल्लाभोवती हत्तींचा कळप कडे करुन फिरत असल्याचे दिसून आले आहे. पिलाच्या सोबतीमुळे कळपातील तरुण हत्ती प्रचंड आक्रमक होत आहेत. त्याकरिता कोणीही शेतकऱ्यांनी कळपाच्या मागे लागून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा वनाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कळपाचा मुक्काम वाढणार
महिनाभरापूर्वी सुलेगाळीत विजेच्या धक्क्याने दोन हत्तींचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्थानिक वनाधिकाऱ्यांवर दुर्लक्षाचा ठपका ठेवण्यात आला होता. आंबोळीतील कळपात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने वन खात्याला दिलासा मिळाला आहे. तथापि पिलामुळे लांब पल्ल्याचे अंतर कापणे या कळपाला शक्य नसल्याने आणखी काही दिवस कळपाचा या परिसरातच मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.