

निपाणी ः राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने खरी कॉर्नरजवळील भुयारी मार्ग कंत्राटदार एस. एम. अवताडे यांनी बंद केला आहे. त्यामुळे यरनाळ, शिरगुप्पी, गोंदीकुप्पी, शेंडूर, बुदलमुख, पांगिर, तहसीलदार प्लॉट, बडमंजी प्लॉट, बिरदेव नगर व परिसरातील नागरिकांना हॉटेल गोल्डन स्टारमार्गे महात्मा गांधी रुग्णालयासमोरून निपाणी शहरात ये-जा करावी लागत आहे. कंत्राटदाराने कच्चा रस्ता केल्याने अपघाताला निमंत्रण देणारा हा रस्ता ठरला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होऊ लागली आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. खरी कॉर्नरजवळील भुयारी मार्ग उंची व रुंदीने मोठा केला जाणार आहे. त्याचबरोबर शिरगुप्पी रोडजवळ व महात्मा गांधी रुग्णालयाजवळ नव्याने भुयारी मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. हे काम अद्याप कंत्राटदराने हाती घेतलेले नाही. तरीसुद्धा खरी कॉर्नरजवळील भुयारी मार्ग बंद केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना गांधी हॉस्पिटलमार्गे फिरून शहरात ये-जा करावी लागत आहे. सध्या असलेल्या सर्व्हिस रोडवरून बेळगावकडून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक भरधाव होत आहे. रस्त्यावर पुरेसे गतिरोधक नसल्याने निपाणीकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांना घाबरत हा रस्ता ओलांडावा लागत आहे.
गतिरोधक उभारण्याची मागणी
अपघाताचा धोका असल्याने हा रस्ता दर्जेदार करून आवश्यकठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे. नागरिकांची गैरसोय पाहून माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी एस. एम. अवताडे कंत्राटदारांच्या अधिकाऱ्यांना हा रस्ता डांबरीकरण करून द्यावा व आवश्यक तेथे गतिरोधक उभारण्याची सूचना केली आहे. फोर जी आर ह्युमन राईट्स संघटनेनेदेखील नागरिकांना सुलभ रस्ता देण्याची मागणी केली आहे.