बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
विविध देशांतून पोस्टामार्फत मागवण्यात आलेले 21.17 कोटींचे अमली पदार्थ सीसीबी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय टपाल खात्यामार्फत अमली पदार्थ मागवण्यात येत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर छापा घालून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यू. एस., यू. के., बेल्जियम, थायलंड, नेदरलँड व इतर देशांतून बंगळुरात आलेल्या पार्सल तपासण्यात आले. श्वानपथकाची मदत यासाठी घेण्यात आली. सुमारे 3,500 संशयास्पद पार्सल तपासून त्यापैकी 606 पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळले होते. त्यानंतर याचा माग घेण्यात आला.
विदेशातून पोस्टाने अमली पदार्थ मागवून त्याची विक्री केली जात होती. सीसीबी पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने त्यांच्यावर नजर ठेवली होती. नियोजनबद्धपणे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेले अमली पदार्थहायड्रो गांजा 18.06 किलो, एल. एस. डी. 2569 किलो, एमडीएमस 1.618 किलो, एक्स्टेसी गोळ्या 11,908, हेरॉईन 770 ग्रॅम, कोकेन 102 ग्रॅम, अॅमफिटामाईन 6.280 किलो, चरस 326 ग्रॅम, गांजा तेल 1.217 किलो, मॅथाक्लीन 445 ग्रॅम, इ सिगारेट 11, निकोटीन 102 मि. लि., तंबाखू 400 ग्रॅम. या अमली पदार्थांचे पार्सल मागवण्यात आले होते.