

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेतून लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे लोकांच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. बेकायदेशीर कामांची चौकशी करावी आणि महापालिका सभागृह बरखास्त करण्यात यावे, अशा मागण्या करत सोमवारी (दि. 30) श्रीराम सेना, म. ए. युवा समितीसह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सोमवारी सकाळी सरदार्स मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
स्मार्ट सिटी योजना आणि महापालिकेने शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी.बी. रोडपर्यंतचा रस्ता बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने जमीनमालकांना नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. आता ती जमीन मालकांना परत करण्यात आली आहे. यामध्ये सामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात पैसा गेला आहे. त्यामुळे हा बेकायदेशीर रस्ता बांधणार्या आणि स्मार्ट सिटी निधीचा गैरवापर करणार्या अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर भा.दं.वि.कलम 409 आणि 120बी अन्वये तत्काळ कारवाई केली जावी. भूसंपादनाची प्रक्रिया राबवताना कलम 300 अ, तसेच भूसंपादन कायदा 2013 मधील भरपाई आणि पारदर्शकता यांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका सभागृह बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
महापालिकेचे वार्षिक उत्पन्न 40 कोटी रुपये असताना रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्या जागेचे मालक बाळासाहेब पाटील यांना 20 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा ठराव महापालिका सभागृहाने संमत केला. वैयक्तिक स्वार्थासाठी हा जनतेच्या निधीचा केलेला गैरवापर आहे. त्यामुळे कर्नाटक महापालिका कायदा 1976 च्या कलम 99 अंतर्गत कायद्याच्या चौकटी बाहेर कृती करणार्या आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करणारी महापालिका बरखास्त करण्यात यावी. आता रस्ता बंद करण्यात आल्यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक कपिलेश्वर कॉलनी रोडवरून सुरू आहे. तेेथील अर्धवट अवस्थेत असलेले रस्त्याचे विकास काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले जावेत.
रेल्वे उड्डाणपुलांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई केली जावी. याखेरीज स्मार्ट सिटी निधीच्या विनियोगाचा श्वेत लेखापरीक्षण अहवाल जनतेसमोर सादर केला जावा, अशा मागण्या जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आल्या. जिल्हाधिकार्यांच्या अनुपस्थितीत निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदन स्वीकारले. माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, रणजित चव्हाण-पाटील, आनंद आपटेकर, राजू मरवे, माजी महापौर किरण सायनाक, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, विजय भोसले, विनायक गुंजटकर, किशोरी कुरणे, मनोहर होसूरकर, सुभाष घोलप, चंद्रकांत कोंडुसकोप, भरत पाटील, अमित देसाई, उमेश कुर्याळकर, राकेश पाटील, सागर पाटील, लक्ष्मण हिरोजी आदी सहभागी झाले होते.
मोर्चात खादरवाडी येथील शेतकरीही सहभागी झाले होते. दोन वर्षांच्या लढ्यानंतर त्यांनी जमीन परत मिळवली आहे. याबाबत त्यांनीही माहिती दिली. शेतकर्यांच्या जमिनीवर डोळा ठेवणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.