

धारवाड : चाकूहल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यात एका पोलिस अधिकार्यासह दोघे जण जखमी आहेत; मात्र पोलिसांनीही गोळीबार करून हल्लेखोराला जखमी केले आणि अटक केली. मंगळवारी धारवाडमध्ये हा प्रकार घडला.
ख्वाजा शिरहट्टी ऊर्फ मलिक असे संशयिताचे नाव आहे त्याच्यावर धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धारवाड उपनगर पोलिस स्थानकाचे निरीक्षक दयानंद शेगुनसी आणि हेड कॉन्स्टेबल मुस्तफा हेदेखील जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
ख्वाजा शिरहट्टी ऊर्फ मलिक याने धारवाडमधील क्रांती गल्ली येथील राघवेंद्र गायकवाड यांच्या मानेवर आणि पाठीवर चाकूने वार केले. फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला घटनास्थळी नेले जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याला इशारा दिला आणि हवेत गोळीबार केला. तथापि त्याने त्याला त्याने दाद दिली नाही. यामुळे पोलिसांनी त्याच्या पायात गोळी झाडली, असे पोलिस आयुक्त एन. शशीकुमार यांनी पत्रकारांना सांगितले.