

बेळगाव : बेळगावात शनिवारी (दि. 12) राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे वीस हजारांहून अधिक खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संदीप पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दैनंदिन लोक अदालत भरवली जात आहे. त्यात प्रलंबित खटले निकालात काढले जात आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य जनतेचा वेळ आणि पैसा वाचत आहे. दैनंदिन लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी तीन महिन्यांतून एकदा राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली जाते. ती शनिवारी होत आहे.
यामध्ये कौटुंबिक न्यायालयातील खटले निकालात काढण्याऐवजी पती-पत्नींमधील गैरसमज दूर करुन त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासह दिवाणी, चेक बाऊन्स, बँकेची कर्ज प्रकरणे, फौजदारी, हेस्कॉमची थकीत बिले, अपघात विमा याचबरोबर इतर खटले निकालात काढले जाणार आहेत प्रत्येक न्यायालयात सकाळी दहा वाजता लोक अदालतीला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जास्तीत जास्त खटले सामोपचाराने सोडविण्यासाठी 90 दिवस मध्यस्थी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. ‘देशासाठी मध्यस्थी’ या घोषवाक्याद्वारे प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील न्यायालयांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार 1 जुलैपासून मोहिमेला प्रारंभ झाला असून ती 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. दरमहा प्रत्येक सोमवारी पक्षकारांना न्यायालयात बोलावून सलोख्याने खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यांतर्गत जिल्हा न्यायालयासह उच्च न्यायालयातील खटलेही निकालात काढले जाणार आहेत, असे न्या. पाटील यांनी सांगितले.
‘देशासाठी मध्यस्थी’ मोहिमेसाठी दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्टमध्ये 4, 11, 18 व 25 रोजी तर सप्टेंबरमध्ये 1, 8, 15, 22 या तारखेला खटले समेटाने निकालात काढले जातील. प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील न्यायालयांमध्ये ही मोहीम राबविली जाणार असून मध्यस्थी करण्यात आलेले सर्व खटले 6 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाकडे वर्ग केले जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.