

बेळगाव : राज्याच्या सहकार क्षेत्रात सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शनिवारी 16 जागांसाठी 35 जणांकडून 66 अर्जदाखल झाले आहेत. चिकोडी, बेळगाव तालुका, गोकाक, सौंदत्ती, यरगट्टी, मुडलगी येथून एकेक अर्ज दाखल झाल्याने याठिकाणी बिनविरोध निवड होणार आहे. दि. 12 रोजी अर्जांची छाननी असून, दि. 13 अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी इतर मतदारसंघातून तर उत्तम पाटील यांनी निपाणीतून अर्ज दाखल केले. 35 जणांकडून 66 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दि. 13 रोजी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पॅनेलमधून बेळगावमधून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी, गोकाकमधून आमदार रमेश जारकीहोळी यांचे सुपुत्र अमरनाथ जारकीहोळी यांनी अर्ज दाखल केले. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज नसल्याने त्यांची निवड निश्चित झाली आहे. जारकीहोळी बंधूंच्या सुपुत्रांची राजकारणात एंट्री जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे.