

Shree Datta Sansthan Pantbalekundri
निपाणी : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातून सहसचिव पदावरून निवृत्त झालेले ज्येष्ठ अधिकारी तसेच श्री दत्त संस्थान क्षेत्र पंतबाळेकुंद्रीचे मॅनेजिंग ट्रस्टी प. पू. दादासाहेब तथा गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे सोमवारी (दि.१६) ठाणे येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र, विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव मंगळवार (दि.१७) रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर सकाळी ११ वाजता ठाणे येथील वैकुंठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मंत्रालयीन सेवेत असताना दादासाहेब पंतबाळेकुंद्री यांची ओळख अत्यंत अभ्यासू, प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ अधिकारी अशी होती. नगरविकास विभागाशी संबंधित कोणताही गुंतागुंतीचा विषय उपस्थित झाला की मंत्रालयात “पंतांना विचारा” अशी प्रतिक्रिया उमटत असे. नगरविकास विषयक कायद्याचे त्यांना सखोल ज्ञान होते. प्रभावी पदावर कार्यरत असतानाही त्यांनी कधीही पदाचा गैरवापर केला नाही. त्यांची निर्लोभी, स्पष्टवक्ती आणि तत्त्वनिष्ठ वृत्ती सर्वत्र आदराने उल्लेखली जात असे.
त्यांच्या कार्यकाळात अनेक मुख्यमंत्री तसेच कायदेतज्ज्ञ रामराव आदिक, पतंगराव कदम यांसारख्या नेत्यांनाही त्यांच्या मतांचा आदर करावा लागत असे. मंत्रालयात त्या काळात कार्यरत अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकार याचे साक्षीदार असल्याचे सांगितले जाते.
त्यांनी लिहिलेले ‘आत्मभान’ हे आत्मकथन त्यांच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे मानले जाते. मुंबई उच्च न्यायालयात विविध प्रकरणांमध्ये शासनाच्या वतीने मांडलेले त्यांचे मुद्दे अनेकदा न्यायालयाने मान्य केले होते.
नगरविकास सचिव डी. टी. जोसेफ यांच्या सहकार्याने त्यांनी मुंबई नागरी वारसा नियमावली तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या नियमावलीला विकासकांकडून मोठे आव्हान दिले गेले होते. मात्र न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांच्या न्यायालयात पंतबाळेकुंद्री यांनी शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यामुळे मुंबईतील अनेक ऐतिहासिक वास्तू आणि नागरी वारसा जतन होण्यास मोठी मदत झाली. अन्यथा कुलाबा ते माहीम-शीव या परिसरातील अनेक ऐतिहासिक वास्तू नष्ट होऊन त्या ठिकाणी सिमेंटचे जंगल उभे राहिले असते, अशी भावना व्यक्त केली जाते.
त्यांच्या निधनाने एक प्रामाणिक, अभ्यासू आणि आदर्श लोकसेवक हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
थोडक्यात अल्पपरिचय
प. पू. गो. श्री. तथा दादासाहेब पंतबाळेकुंद्री हे श्री पंतमहाराजांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील ज्येष्ठ सदस्य होते. दत्त संस्थान आणि अवधूत संप्रदायाच्या वाटचालीत त्यांचे मार्गदर्शन, सल्ला आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या सुमारे ७५ वर्षांच्या संस्थानाच्या प्रवासाचे ते साक्षीदार होते. पंतबंधू गोपाळकाका, नरसूकाका, भाऊसाहेब आणि बाबूशा यांच्याप्रमाणेच दादासाहेबांनीही संस्थानच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त संस्थानाची वाटचाल अधिक बळकट झाली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील नगरविकास खात्यात त्यांनी वरिष्ठ पदावर कार्य केले.