Nipani news: निपाणी परिसरात तंबाखू चाकीच्या कामांना वेग

यंदा उत्पादनात वाढ; तीन हजार हेक्टरवर लागवड, चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा
Nipani news
Nipani news: निपाणी परिसरात तंबाखू चाकीच्या कामांना वेगPudhari
Published on
Updated on

निपाणी : निपाणीसह परिसरात तंबाखू कापणी व भरणीची कामे पूर्णत्वास आली असून सध्या तंबाखू चाकीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांच्या घरात सुरक्षितपणे पीक दाखल झाल्याने दिलासा मिळाला असला तरी आता सर्वांच्या नजरा बाजारभावाकडे लागल्या आहेत. यंदा उत्पादन चांगले झाल्यामुळे दरही समाधानकारक मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

गेल्या आठवड्यापासून चाकी कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मजुरांच्या मदतीने तंबाखूची स्वच्छता करून त्याचे वर्गीकरण केले जात आहे. त्यानंतर बोदामध्ये वजन करून माल भरला जात आहे. चांगल्या प्रतीचा माल वेगळा ठेवून व्यापाऱ्यांकडे नमुने पाठवले जात आहेत. सध्या व्यापाऱ्यांकडून दराचा अंदाज घेतला जात असून अंतिम भाव जाहीर होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. परिसरात यंदा सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावर तंबाखूची लागवड करण्यात आली होती. हंगामाच्या सुरुवातीपासूनच पिकाला पोषक वातावरण लाभले. योग्य वेळी पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे पिकाची वाढ समाधानकारक झाली. परिणामी उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

निपाणी परिसरात अनेक दशकांपासून तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. येथील काळी कसदार जमीन तंबाखू पिकासाठी पोषक मानली जाते. येथील तंबाखूची चव, मिठास आणि गुणवत्ता उच्च प्रतीची समजली जाते. कोडणी, अकोळ, खडकलाट या गावांप्रमाणे निपाणी परिसरातील तंबाखूलाही बाजारपेठेत चांगली मागणी असते. त्यामुळे दरही तुलनेने चांगला मिळत आला आहे. परिसरातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अर्थकारण आजही तंबाखू पिकावर अवलंबून आहे. यंदाच्या वाढीव उत्पादनामुळे बाजारात दर स्थिर राहतील का, याबाबत काहीशी उत्सुकता आहे. मात्र चांगल्या प्रतीच्या मालाला योग्य दर मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news