बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते, खासदार, आमदारांना बुधवारी दिल्लीला काँग्रेस हायकमांडने पाचारण केले आहे. पक्षांतर्गत नाराजी, बदली प्रकरणावरून राज्यभरात सुरू असणारी चर्चा, आगामी लोकसभा निवडणुका, पक्ष पातळीवरील जबाबदार्या, याबाबत चर्चा होणार आहे. बैठकीला राज्यातून 50 जण सहभागी होणार आहेत. बुधवारी दुपारी 3 वा. बैठकीचे आयोजन केले आहे. तीन टप्प्यात चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत सरकारने निवडणूक काळात जाहीर केलेल्या हमी योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र पक्षांतर्गत अंसतोष वाढत आहे. मंत्र्यांंच्या विरोधात आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनीही नाराजी व्यक्त केली असून काही आमदारांनी तक्रार केली आहे. याबाबत चर्चा होणार आहे.
बैठकीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे. बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनिती निश्चित करण्यात येईल. यासाठी मंत्री, खासदार, आमदार यांना बैठकीला पाचारण केले आहे. लोकसभेची जबाबदारी नेत्यांवर सोपवण्यात येणार आहे. मंत्री, खासदार, आमदार बैठकीत सहभागी होणार असून तीन टप्प्यात चर्चा करण्यात येणार आहे.
बंगळूर येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी राहुल गांधी आले होते. त्यावेळी राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. परंतु त्याचवेळी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांचे निधन झाले. परिणामी बैठक स्थगित करण्यात आली. सदर बैठक आता दिल्लीत घेण्यात येणार आहे. सरकारने चार हमी योजना लागू केल्या आहेत. याबाबत कोणत्या प्रकारे प्रचार करण्यात यावा. आगामी काळात सरकारच्या वाटचालीबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शिवकुमार यांनी दिली.
लोकसभा निवडणुकांची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर सोपविण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड कोणत्या आधारावर करण्यात यावी, याबाबत आतापासूनच तयारी करण्यात येणार आहे. निवडणुका जिंकण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येणार आहेत. याबाबत हायकमांड काही सूचना करणार आहेत.