चिकोडी : चिकोडी नगर परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसने युती करत निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी भाजपच्या वीणा जगदीश कवरगीमठ, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे इरफान बेपारी यांची निवड झाली. विशेष म्हणजे एकूण २३ पैकी भाजपकडे १३ तर काँग्रेसकडे १० नगरसेवक असतानाही भाजपने उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच या निवडी बिनविरोध झाल्या.
नगर परिषदेच्या सभागृहात चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित होते. त्यासाठी भाजपकडून वीणा कवटगीमठ यांनी एकमेव अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपद अ वर्गासाठी आरक्षित होते. त्यासाठी कॉंग्रेसचे नगरसेवक इरफान बेपारी यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर नूतन नगराध्यक्षा वीणा कवटगीमठ म्हणाल्या, मला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे.
उपनगराध्यक्ष बेपारी म्हणाले, आमदार गणेश हुक्केरी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व इतर नेत्यांनी मला उपनगराध्यक्षपदी निवडीसाठी सहकार्य केले. पहिल्यांदाच बेपारी समाजाला पद देण्यात आले आहे, याचा आनंद वाटतो. सर्वांना विश्वासात घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्न करेन, ज्येष्ठ नगरसेवक जगदीश कवटगीमठ म्हणाले, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, आमदार प्रकाश हुकेरी, आमदार गणेश हुक्केरी व माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांच्या मार्गदर्शाखाली शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्रित प्रयत्न करणार आहेत. पुढील काळात विकासावर प्राधान्य दिले जाईल.
निवडींनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकत्यांनी जल्लोष केला. नगरसेवक प्रवीण कांबळे, अनिल माने, संजय कबटगीमठ, तानाजी कदम, रंजना कामगौड़ा, बाबू मिरजे, नागराज मेदार, आदम गणेशवाडी, विजय भास्कर इटगोणी, गुलाबहुसेन बागवान, संतोष टवळे, शांभवी अश्वथपूर यांच्यासह नगरसेवक आणि मुख्याधिकारी उपस्थित होते. डीवायएसपी गोपाल कृष्ण गौडर, सीपीआय विश्वनाथ चौगुले, पीएसआय बसनगौडा नेरली यांनी बंदोबस्त ठेवला होता.
नेहमी सभागृहात भाजप व कॉंग्रेसचे नगरसेवक एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असतात. पण आजच्या निवडणुकीनंतर काँग्रेस व भाजपचे नगरसेवक नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना एकत्र शुभेच्छा देत असल्याचे दिसून आले.
एकूण नगरसेवक......... २३
भाजप............१३
काँग्रेस............१०