

बेळगाव : बेळगाव परिसरातून आंबोली, तिलारी व महिपाळगडला वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर रविवारी (दि. 20) चंदगड पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावरुन नियमबाह्य प्रवास व मद्यपान करुन वाहने चालविणार्या एकूण 24 जणांवर कारवाई करत 12 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यातील दोघांवर ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करण्यात आले.
चंदगडचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, पोलिस उपनिरीक्षक शीतल धविले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकांनी बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील शिनोळी व तडशिनहाळसह महिपाळगडनजीकच्या सुंडी वझर धबधब्याजवळ ही कारवाई केली.
सध्या पावसाळी पर्यटन हंगाम बहरला आहे. यामुळे सीमाभागातील शेकडो पर्यटक आंबोलीसह चंदगड तालुक्यातील तिलारी, महिपाळगड आदी ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी जात आहेत. मात्र, पर्यटनासाठी जाताना हुल्लडबाजी करण्यासह काही तरुणांकडून मद्यपान करुन वाहने चालविली जात आहेत. परिणामी अपघात होत आहेत. तसेच नियमबाह्य वाहन चालविणार्या तरुणांची संख्या वाढत आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्यांचे प्रमाणही अधिक आहे. यामुळे चंदगड पोलिसांनी रविवारी मोहीम राबविली.
पोलिसांनी हुल्लडबाज व रहदारी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यासाठी वेंगुर्ला राज्यमार्गावर शिनोळी खुर्द व तडशिनहाळ तर सुंडी वझर धबधब्याजवळ पथके तैनात केली होती. या पथकांनी पर्यटन करुन बेळगावकडे परतणार्या पर्यटकांना अडवून तपासणी केली. त्याच्याकडून वाहनांची सर्व कागदपत्रे तपासली. ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राइव्हसह, हेल्मेट आदींची तपासणी करुन कारवाई करण्यात आली. एकूण 24 जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 12 हजार दंड वसूल करण्यात आला. पर्यटकांनी नियमबाह्य प्रवास करु नये अन्यथा कडक कारवाई करु, असे आवाहन चंदगड पोलिसांनी केले आहे. कारवाईत कॉन्स्टेबल नितीन पाटील, हवालदार पवन कांबळे, ए. एन. ठोंबरे, बी. टी. कोळी, ए. बी. शिंदे, एन. ए. पाटील आदींनी भाग घेतला.
सीमाभागातून येणार्या पर्यटकांचे चंदगड तालुक्यात स्वागतच आहे. मात्र, नियमबाह्य प्रवास करुन येणारे प्रवासी व दुचाकीस्वार तसेच पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करु. मद्यपान केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे, कुणीही नियमांचे उल्लंघन करु नये.
शीतल धविले, पोलिस उपनिरीक्षक, चंदगड