

बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले तर एकजण जखमी झाला. बेळगाव-बागलकोट राज्यमार्गावरील सोमनट्टीजवळ रविवारी (दि. 10) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
बाळकृष्ण बसाप्पा सुलदाळ (वय 19, रा. सिद्धनहळ्ळी, ता बेळगाव) व सचिन यल्लाप्पा बोरीमरद (वय 19, रा. करीकट्टी, ता. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्काप्पा बोरीमरद (वय. 23, रा. करीकट्टी, ता. बेळगाव) हे जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बाळकृष्ण, सचिन व लक्काप्पा हे तिघे कारमधून बेळगावकडे येत होते. सोमनट्टीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की चालकाच्या बाजूला बसलेला सचिन जागीच ठार झाला. तर बाळकृष्ण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे हलविण्यात येत होते. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तर कारमधील लक्काप्पा गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बेळगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नेसरगी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.