खानापूर; पुढारी वृत्तसेवा : पिकाला पाणी देऊन चालत घरी परतणार्या चौघा शेतकर्यांना भरधाव कारने ठोकरल्याने तिघांचा मृत्यू झाला. धारवाड-रामनगर मार्गावर गोधोळी (ता. खानापूर) येथे गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अपघातानंतर कारसह चालकाने पलायन केले आहे.
पुंडलिक लोकाप्पा रेडेकर (वय 72), कृष्णा लोकाप्पा रेडेकर (56), आणि महाबळेश्वर नागेंद्र शिंदे (55, तिघेही रा. गोधोळी ता. खानापूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांची नावे आहेत. पुंडलिक आणि कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत. तर मंजुनाथ काळगिणकर (42) हे जखमी झाले आहेत.
चारही शेतकरी ऊसाला पाणी देण्यासाठी शेताकडे गेले होते. गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर भरधाव वेगाने येणार्या कारने त्यांना जोराची धडक दिली. धडकेत पुंडलिक रेडेकर व महाबळेश्वर शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा रेडेकर यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुंडलिक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन मुली, कृष्णा यांच्या पश्चात पत्नी व मुलगा तसेच महाबळेश्वर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
चार दिवसांपूर्वी रेमाणी बिर्जे नामक शेतकर्यावर अस्वलाने हल्ला केला होता. अस्वलाच्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. त्यामुळे शेतकर्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. तेव्हापासून शेतकरी रात्रीच्या वेळी शेताकडे पाणी देण्यासाठी जाताना चार-पाच जण मिळूनच जातात. वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणारा थ्री फेज विद्युत पुरवठा दिवसा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चारच दिवसांपूर्वी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या गोधोळी येथील एका शेतकर्यावर अस्वलाने हल्ला केला. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड धास्तावला आहे. रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने थ्री फेज विद्युत पुरवठा दिवसा करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. पण हेस्कॉमने दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्यात पिकांना जगवण्यासाठी शेतकर्यांना जीव धोक्यात घालून रात्रीचा मुक्काम शेतात करावा लागतो. पिकाला पाणी देऊन शेतातून मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत घरी परतणार्या शेतकर्यांना मागून येणार्या कारने ठोकरल्याने पिक जगवण्यासाठी केलेल्या धडपडीत तिघांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.