Bus Strike Karnataka | सकाळी घोळ, लगेच एस्मा, दुपारी बंद मागे
बेळगाव : थकीत वेतनासह वेतनवाढीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या संघटनांनी मंगळवारपासून पुकारलेला बंद आणि उच्च न्यायालयाने एक दिवसासाठी बंद पुढे ढकलण्याचा दिलेला आदेश अशा स्थितीत मंगळवारी दुपारपर्यंत बस बंदचा घोळ झाला. अधिकृतपणे बस बंद करता न आल्याने निम्मे कर्मचारी कामावर आलेच नाहीत. परिणामी, बेळगावसह राज्यभरात निम्म्याच संख्येने बस धावल्या; मात्र उच्च न्यायालायने अत्यावश्यक सेवा कायदा अर्थात एस्मा लागू करण्याचा इशारा देताच बंद मागे घेण्यात आला. त्यामुळे बुधवारपासून बससेवा सुरळीत होणार आहे.
संपाच्या धास्तीमुळे बेळगावातील बससेवा निम्म्यावर आली होती. संप सुरू असेल म्हणून अनेक प्रवाशांनी बसप्रवास टाळला. वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी परिवहन कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने संपाची हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने आंदोलन एक दिवस स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे, संप मंगळवारपासून सुरू होणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्यानुसार मंगळवारी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकांतून विविध मार्गांवर आणि आंतरराज्य बससेवाही सुरू होती.
सकाळी निपाणी, कोल्हापूर, अथणी, हुक्केरी, बैलहोंगल, विजापूर, धारवाड, हुबळीसह मुंबई, ठाणे, पुणे, बारामती, कोल्हापूर आदी आंतरराज्य मार्गांवर बसेस धावल्या. सकाळच्या सत्रात काही बसफेर्या कमी होत्या. दुपारनंतर बसफेर्या नेहमीप्रमाणे सुरू होत्या. बेळगाव विभागाला महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द लागून आहे. त्यामुळे बेळगावातून महाराष्ट्र आणि गोवा राज्यात नेहमीप्रमाणे बसेस धावल्या. पण, प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
ग्रामीण बससेवा विस्कळित
आंतरराज्य बससेवेवर परिणाम झाला नसला, तरी ग्रामीण बससेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. ग्रामीण भागातील काही मार्गावर बसेस धावल्या नाहीत. त्यामुळे, प्रवासी आणि विद्यार्थी वर्गाचे हाल झाले. त्यांनाच पायीच इच्छितस्थळी पोचावे लागले. विशेषता परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. काही महाविद्यालयांच्या परीक्षा सुरु होत्या. पण, बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्याना महाविद्यालयात पोचण्यात अडचणी आल्या.
पोलिस आयुक्तांकडून पाहणी
मंगळवारी संप होणार नसला तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मध्यवर्ती बसस्थानकात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्वतः परिवहन अधिकारी व सहकार्यांसह बसस्थानकाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी बससेवा सुरु ठेवली होती. मात्र, काही बसचालक व वाहक सेवेवर येऊ शकले नाहीत. त्यामुळे, काही मार्गांवर बसा सोडताना अडचणी आल्या. शिवाय गेले आठ दिवस संपाची चर्चा सुरु असल्याने प्रवाशांचाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
आनंद शिरगुप्पीकर, आगार व्यवस्थापक, बेळगाव

