

बेळगाव : अतिवाड राज्य हद्दीजवळील तलावात म्हैस धुण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकर्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 24) उघडकीस आली. मारुती गणू बाळेकुंद्री (वय 80, रा. होसूर, ता. चंदगड ) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मारुती बुधवारी (दि. 23) दुपारी बारा वाजता म्हशीसह गावाशेजारील तलावाकडे गेले होते. तलावात उतरल्यानंतर ते अचानक पाण्यात बुडाले. यानंतर दोन तासांनी त्यांची म्हैस घरी परतली. संशय आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.
तलावाच्या काठावर त्यांनी आपल्या काही वस्तू ठेवल्या होत्या. ते बुडाल्याच्या संशयावरुन बुधवारी सायंकाळपर्यंत चंदगडमधील पास रेस्कू टिमने तलावात शोधमोहिम राबवली. पण, ते न सापडल्याने गुरुवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला.
दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. चंदगडमध्ये उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिस ठाण्यात झाली आहे.