

बेळगाव : शहरामध्ये बेकायदेशीर ब्युटी पार्लर तसेच स्किन केअर सेंटरचे पेव फुटले आहे. या सेंटरमधून प्रकारची औषधे तसेच सौंदर्य प्रसाधने बेकायदा दिली जात होती. त्याचा परिणाम स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरांवर होत आहे. त्यामुळे डर्मेटोलॉजिस्ट असोसिएशनने आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी शहरातील 38 ब्युटी पार्लर व स्किन केअर सेंटरवर छापे घातले. त्यात चार ब्युटी पार्लरला टाळे ठोकण्यात आले आहे. या कारवाईने खळबळ उडाली असून अनेकांनी ब्युटी पार्लर व स्किन सेंटर बंद करून पलायन केले आहे.
शहरातील टिळकवाडी, आरपीडी क्रॉस, अनगोळ, वडगाव, शाहूनगर, कॅम्प परिसरातील सेंटरवर कारवाई करण्यात आली. आरोग्य विभागाच्या कारवाईमुळे अनेकांनी गेले दोन दिवस सेंटर बंद ठेवली आहेत.
जाहिरातबाजी करून ग्राहकांना आकर्षित करून त्यांची फसवणूक सुरू होती. केस, चर्मरोगसंदर्भातील आजार, आकर्षक दिसण्यासाठी विविध सौंदर्य प्रसाधनाचा वापर करून फसवणूक केली जात होती. त्याचबरोबर विक्रीही सुरू होती. स्टेरॉईडसारख्या घातक औषधांचा वापर राजरोसपणे सुरू होता. त्याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
अशा बोगस ब्युटी पार्लर तसेच स्किन केअर सेंटरमुळे शहरातील डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टरांच्या सेवेवर परिणाम होत आहे. कमी दरात उपचार करण्याची जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित केले जात होते. मात्र, त्यांच्या उपचारामुळे अनेकांना दुष्परिणामाना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे अनेकांना अशा उपचार पद्धतीमुळे त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आरोग्य विभागाने हे पाऊल उचलले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आय. पी. गडाद यांच्या नेतृत्वाखाली 30 पथके नेमण्यात आली आहेत. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आरोग्याबाबत कोणीही खेळखंडोबा मांडला असेल तर तो तातडीने थांबवावा, अन्यथा त्यांची गय केली जाणार नाही. कोणाच्या जीवाशी खेळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा बोगस डॉक्टर किंवा स्किन केअर सेंटरवर कठोर कारवाई केली जाणार.
मोहम्मद रोशन, जिल्हाधिकारी