बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जनतेला दिलेल्या हमी योजनांची काँग्रेसने पूर्तता करावी, अशी मागणी करत मंगळवारी भाजपने विधानसभा आणि विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज बंद पाडले, तसेच विधानसौधबाहेरही धरणे आंदोलन छेडले. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजपने दिला. मात्र, हे आंदोलन राजकारण प्रेरित असून, काँग्रेसच्या हमी योजना सहन न झाल्यानेच भाजप असे वर्तन करत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी भाजप काँग्रेसविरोधात आक्रमक झाला. मंगळवारी सभागृहात भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह बंद पाडले. तर सभागृहाच्या बाहेर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. बंगळूरमधील फ्रीडम पार्क येथे कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडताना काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
येडियुराप्पा म्हणाले, काँग्रेसने राज्यात सत्तेवर येण्यासाठी मतदारांना अनेक आश्वासने दिली. गृहज्योती, युवा निधी, अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, शक्ती योजनांचे आश्वासन दिले. त्याची पूर्तता करण्यात यावी. शिवाय धर्मांतरबंदी, गो-हत्या प्रतिबंधक कायदा मागे घेण्यात येऊ नये. हे दोन्ही कायदे मागे घेतल्यास समाजात असंतोष माजेल. दोन समाजात तेढ निर्माण होईल. मतबँक मजबूत करण्यासाठी काँग्रेस कायदे मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे.
कटिल म्हणाले, खोटी आश्वासने देत काँग्रेस सत्तेवर आली आहे. सत्तेवर येताच योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही प्रियांका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांनी दिली होती; पण दोन महिने उलटले तरी आश्वासनपूर्ती करण्यात आलेली नाही. सरकार सर्व पातळींवर अपयशी ठरले आहे.
केंद्र सरकारकडून 5 किलो तांदूळ दिला जातो. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 10 किलो तांदूळ देणे गरजेचे आहे. वीजबिल माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सध्या वीजबिल दुप्पट येत आहे; पण भुर्दंड सामान्यांना बसत आहे. पाठ्यपुस्तकांतून काही पाठ वगळून द्वेषाचे राजकारण करण्यात येत आहे. आंदोलनात माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा, के. एस. ईश्वरप्पा, विश्वेश्वर हेगडे-कागेरी, बी. सी. नागेश, के. सी. नारायणगौडा, मुरुगेश निराणी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला होता.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पहिल्यांदा प्रश्नोत्तरे होतील. त्यानंतर भाजप सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील, असे सांगितले. परंतु, याकडे दुर्लक्ष करत भाजपच्या सदस्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काँग्रेस आमदारांनीही भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यास प्रारंभ केला. यामुळे विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर यांनी काही काळासाठी कामकाज थांबविण्याचा निर्णय घेतला.
विधान परिषदेतही गोंधळ निर्माण झाला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सभागृहात काँग्रेसच्या आश्वासनांबाबत चर्चा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. मंत्री कृष्ण ब्यैरेगौडा यांनी आक्षेप घेत सभागृहाचे कामकाज नियमानुसार होईल, असे बजावले. भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत जोरदार घोषणाबाजीला प्रारंभ केला. सभापतीसमोर ठाण मांडत आंदोलन सुरू केले. यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसने जाहीर केलेल्या हमी योजनांचे पडसाद विधिमंडळातही उमटले. भाजप, काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार घोषणा युद्ध रंगले. परिणामी, सभागृहाचे कामकाज काही तासांसाठी बंद ठेवण्यात आले.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर यांनी प्रश्नोत्तरांना प्रारंभ केला; पण माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्षेप घेतला. आपण दिलेल्या स्थगन प्रस्तावावर पहिल्यांदा चर्चा करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. यावर खादर यांनी सभागृहाच्या नियमानुसार प्रश्नोत्तरे झाल्यानंतर तुमच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.
परंतु, भाजप सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत पहिल्यांदा चर्चा करण्यात यावी. त्यानंतर प्रश्नोत्तरे व्हावीत, अशी मागणी केली. यावर काँग्रेसच्या सदस्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या समोर जाऊन आंदोलन सुरू केले.