

Bhima Riverbank Murder Case : कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर येथे एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विजापूर शहराच्या वेशीवर असलेल्या इत्तीनगीहाळजवळ आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवरच हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुख्य आरोपी जखमी झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
भीमा नदीकाठच्या भागात झालेल्या ६ जणांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी महेश तलवार याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश गेल्या २३ दिवसांपासून फरार होता. तो एका ठिकाणी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक त्याला अटक करण्यासाठी गेले होते. या कारवाईदरम्यान आरोपी महेशने पोलिसांवर हल्ला करून आणि त्यांच्यावर दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चडचणचे सीपीआय (CPI) परशुराम मांगुली यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये महेशच्या उजव्या पायाला गोळी लागली.चा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला देखील केला.
जखमी महेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.पोलीस अधीक्षक (SP) लक्ष्मण निंबरगी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
भीमा नदीकाठच्या भागात २९ मे रोजी गोविंदपूर गावाजवळ हे ६ जणांचे हत्याकांड घडले होते. गावाजवळील शेतात चडचण येथील निराळे कुटुंबातील पाच सदस्य आणि इतर एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती.या हत्येसाठी महेश आणि त्याच्या टोळीने १५ लाख रुपयांची सुपारी घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस अधीक्षक निंबरगी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीत अधिक माहिती समोर येईल.