

बंगळूर : खासगी बस व कारची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यादगिरी जिल्ह्यातील शांतपूर क्रॉस देवापूर येथे शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला.
रायचूर जिल्ह्यातील सिरावर ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्णा नायक हे आपल्या कुटुंबासह कारने सुरपूर येथील वेणुगोपाल स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते सिरावरच्या दिशेने परत जात होते. शांतपूर क्रॉसजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करताना बंगळूरहून गुलबर्ग्याला जाणाऱ्या बसला समोरून धडक बसली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला असून, दरम्यान बसला समोरच्या बाजूला आग लागली.
बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत एकूण 9 जणांचा जागीच जळून मृत्यू झाला आहे. सुदैवाने बसमधील 20 प्रवासी सुरक्षित बचावले. अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली.
कृष्णा नायक (वय 52), अनंता कलाकृष्णा (वय 45), शरणप्पा (वय 36), निसर्ग शरणप्पा (वय 30), सिद्धार्थ शरणप्पा (वय 5), शशिकला (वय 30), अद्विक (वय 5), चंदना (वय 8) व दीड वर्षीय श्रीनिधी अशी मृतांची नावे आहेत. अपघातात शशिकला यांचा मुलगा विराट हा एकमेव बचावला. हे सर्व रायचूरचे रहिवासी आहेत.