Siddaramaiah: सिद्धू आज पायउतार ?

राज्यपालांना दुपारी भेटणार; तत्पूर्वी विधिमंडळ पक्षाची बैठक, तीन उपमुख्यमंत्र्यांसाठी प्रयत्न
Siddaramaiah: सिद्धू आज पायउतार ?
Published on
Updated on

बंगळूर : अनेक दिवसांपासूनच चर्चेत असलेला नेतृत्त्वबदल अखेर होणार असून, मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या गुरुवारी पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. त्यांनी राज्यपालांची भेट मागितली असून, राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना दुपारी राजभवनावर बोलावले आहे. याच भेटीत सिद्धरामय्या राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचीही (काँग्रेसचे सर्व आमदार) बैठक बोलावली आहे. त्यामुळे ते राजीनामा देणार हे निश्र्चित असल्याचे मानले जाते. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री बनतील. तर सिद्धरामय्यापुत्र यतींद्र यांच्यासह तीन किंवा चार जणांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार आहे.

सिद्धरामय्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या निवासस्थानी मंत्री आणि काही निकटवर्तीयांसाठी न्याहरी बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीनतर ते थेट राजभवनात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळीही सिद्धरामय्यांनी उद्योगमंत्री एम. बी. पाटील, समाज कल्याणमंत्री महादेवप्पा, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, उर्जा मंत्री के. जे. जॉर्ज, नगर विकास मंत्री भैरती सुरेश, कायदा सल्लागार पोण्णण्णा यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निश्र्चय केल्याचे समजते. त्याआधी दिल्ली बैठकीत राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी त्यांना पक्षहितासाठी पायउतार होण्याची सूचना केली होती.

गुरुवारी सकाळी होणाऱ्या बैठकीत ते दिल्लीत घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल सर्व मंत्र्यांना आणि जवळच्या सहकाऱ्यांना माहिती देतील आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर करतील, असे सांगण्यात येत आहे.

आज साधणार संवाद

पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसौध परिसरात नेहरूंच्या पुतळ्याला सिद्धरामय्या यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, गुरुवारी सर्व राजकीय घडामोडींवर सविस्तर बोलेन. मुख्यमंत्रिपदाबद्दलच्या प्रश्र्नांनाही उद्याच उत्तरे देईन. गुरुवारी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे. त्यावेळी नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे. सिद्धरामय्या आमदारांच्या बैठकीत आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा करतील. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढील विधानसभा नेत्याचे नाव निश्चित केले असून ते बैठकीत जाहीर करण्यात येईल. त्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

सिद्धू अजूनही ठाम!

एकीकडे सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जातील, अशी माहिती मिळत असली तरी त्यांनी अद्याप मुख्यमंत्रिपदाच्या हस्तांतरणाबाबत हायकमांडने दिलेला प्रस्ताव स्वीकारलेला नाही, असेही सांगितले जात आहे. सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नेत्यांकडून सिद्धरामय्या यांना राजीनामा देणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे. दिल्ली येथील बैठकीत केवळ पक्ष संघटनबाबत चर्चा झाली. गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या प्रकारे सरकार चालवणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा का देतील, असा प्रश्न उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी पत्रकारांना केला. दिल्लीतील बैठकीत फक्त राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांवर चर्चा झाली. बाकी सर्व अफवा आहेत. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची भावनिक पोस्ट

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या राजीनाम्याच्या पूर्वसंध्येला आपल्या ३ वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला दिलेले प्रत्येक वचन आम्ही पूर्ण केले आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. पंचहमी योजना यशस्वीपणे राबवून त्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवल्या आहेत. कोणीही उपाशी झोपू नये यासाठी राबवलेली अन्नभाग्य योजना कोट्यवधी कुटुंबांना आधार ठरली आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत वितरणावर १८,८९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ४.२६ कोटी शिधावाटपधारक निश्चिंतपणे दिवसातून तीनवेळा जेवण करत आहेत, असा संदेश त्यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news