

बंगळूर : सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी कर्नाटकातील पहिले सायबर कमांड सेंटर बंगळूऱमध्ये सुरू करण्यात आले आहे. पोलिस महासंचालक प्रणव मोहंती यांची डीजीपी आणि कमांड सेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केवळ सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करून सुरू केलेल्या कमांड सेंटरमध्ये चार विभाग कार्यरत असणार आहेत.
सायबर गुन्हे शाखा सायबर गुन्हे शोधून काढणार आहे. त्याचबरोबर तक्रारी नोंदवून त्यांची चौकशी करणार आहे. सायबर सुरक्षा शाखा बँक खाती, सोशल मीडिया आणि सॉफ्टवेअर हॅक करणार्यांचा शोध घेईल. आयडीटीयू शाखा सायबर गुन्हेगारांचे स्थान ट्रॅक करेल, सोशल मीडिया संस्थांकडून माहिती मिळवेल आणि याव्दारे आयपी पत्ते सोधले जाणार आहेत. प्रशिक्षण आणि जनजागृती विभाग सायबर कमांड सेंटरच्या अधिकार्यांना प्रशिक्षण देणे, तांत्रिक ज्ञान विकसित करणे, नवीन तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता आणि जनतेमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे ही जबाबदारी सांभाळेल.
सायबर कमांड सेंटरसाठी शहरात स्वतंत्र पोलिस स्थानके असणार आहेत. जिल्ह्याच्या अखत्यारीतील पोलिस स्थानकात तक्रारी दाखल करता येतील. जिल्ह्यांमध्ये नोंदवलेले गुन्हे एसपींच्या निगराणीखाली तपासले जातील. आतापर्यंत 16 हजार सायबर प्रकरणे प्रलंबित आहेत. सायबर प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कमांड सेंटरमुळे सायबर गुन्ह्यांवर आळा बसण्याची अपेक्षा आहे.