

बेनाडी : येथे रविवारी रात्री सहा घरांसह अंगणवाडी इमारतीचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. चोरांच्या हाती किमती साहित्य लागले नसले तरी दोन दुचाकी त्यांनी लंपास केल्या आहेत.
धरमगौडा भीमगोंडा पाटील यांच्या किरण दुकानाचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाजूला असलेल्या दुकानांमध्ये प्रवेश करून किरण दुकानातील साहित्य विस्कटून टाकले. कस्तुरी सिद्धगोंडा पाटील यांच्या घरात प्रवेश करून तिजोरी फोडून 5,10 आणि 20 रुपयांची नाणी लंपास केली आहेत. बिरू मल्लाप्पा ढवणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 3 तिजोरी फोडून साहित्य विस्कटले आहे.
बिरू ढवणे सध्या सांगोला याठिकाणी मेंढरे घेऊन गेल्यामुळे घरातील कोणती वस्तू व रक्कम चोरीची माहिती मिळालेली नाही. विलास बन्ने यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरीतील सर्व कपडे विस्कटले आहेत. संतोष महादेव देशिंगे यांच्याही घरात चोरीचा प्रयत्न केला. माजी ता. पं. सदस्य रावसाहेब जनवाडे यांच्या घरासमोरील दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, हवालदार हिरेमठ यांनी भेट देऊन पाहणी केली.