

बेळगाव : यंदा पावसाळ्याला लवक सुरुवात झाल्याने आठवडाभरात राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत सात फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अजूनही शहरात पाच दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्यात येत होता. त्याप्रमाणे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासियांतून करण्यात येत आहे.
यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वळवाने हजेरी लावल्याने पाणीटंचाई जाणवली नाही. एलअॅण्डटी कंपनीने देखील पाच दिवसाआड पाणीपुरवठा करत दैनंदिन वापराकरिता कूपनलिका, विहिरींचे पाणी नागरिकांना उपलब्ध करुन दिले. बंद पडलेल्या कूपनलिका दुरुस्त केल्या. आवश्यक ठिकाणी? ? कूपनलिकांची खोदाई करण्यात आली. त्यामुळे राकसकोपमधील पाणीसाठ्यात घट झाली नाही.
सलग आठ दिवस झालेल्या पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत सात फूट वाढ झाली आहे. सध्या राकसकोप जलाशयात 2,457.50 फूट पाणीसाठा आहे. त्यामुळे जून महिन्यात निर्माण होणारे पाणीटंचाईचे संकट तूर्तास टळले आहे.
गतवर्षी पाणीपुरवठा आठ दिवसाआडच सुरू होता. यंदा पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. राकसकोप परिसरात जोरदार?पाऊस झाल्याने नदी, नाले प्रवाहित झाले आहेत, अशी माहिती एलअॅण्डटी कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.
यंदा 15 जूनपर्यर्ंत राकसकोप जलाशयातील पाणीसाठा पुरणार अशी माहिती देखील एलअॅण्डटी कंपनीने दिली होती. तसेच महापालिकेने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले होते. मात्र वळीव पाऊस बरसल्याने दिलासा मिळाला आहे.
तुडये, हाजगोळी, तिलारी परिसरात दमदार पाऊस झाल्याने जलाशय पातळीत वाढ झाली आहे.
21 जून 2023 : 2,449.65 फूट
21 जून 2024 : 2,452.55 फूट
21 जून 2025 : 2,457.50 फूट