

बेळगाव : स्मार्ट सिटीज 2.0 साठी निवड झालेल्या महापालिकेच्या स्वच्छता कामांची मंगळवारी (दि. 1) केंद्रीय पथकाने विविध ठिकाणी जाऊन पाहणी केली.
सकाळी केंद्रीय पथकाने महापालिकेकडून घरोघरी जाऊन कशाप्रकारे कचरा संकलन करण्यात येते, याची पाहणी केली. उत्तर विभागातील विविध गल्ल्यांमध्ये जाऊन त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पथकाने तुरमुरीतील कचरा डेपोला भेट दिली. त्याठिकाणी कचर्याची वर्गवारी, प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेतली.
दुपारी एपीएसी येथील बायोगॅस प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पातून शहरातील इंदिरा कँटीनला सिलिंडर पुरवठा करण्यात येतो, त्याबाबत माहिती घेतली. शहरातील भूमिगत कचरा कुंडांची पाहणी केली. त्यानंतर पथकाने इंडाल कारखान्याला भेट दिली. या कारखान्यातील कचरा व्यवस्थापन कशाप्रकारे आहे, याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी बुडा कार्यालयातील स्मार्ट सिटी योजनेच्या कार्यालयात अधिकार्यांची बैठक घेतली.
पथक बुधवारीही शहरात विविध ठिकाणी पाहणी करणार आहे. सिटीज 2.0 मध्ये बेळगावची निवड झाली असून कचरा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून 135 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे, केंद्रीय पथकाची ही पाहणी महत्वाची ठरली आहे. पाहणीवेळी पर्यावरण विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी, अभियंता आदिलखान पठाण, प्रवीणकुमार खिलारे आदी उपस्थित होते.