

बेळगाव : भरधाव टँकरच्या धडकेत एक अज्ञात इसम जागीच ठार झाल्याची घटना नुकतीच येडियुराप्पा मार्गावर मालिनी सिटीजवळ घडली. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी उत्तर रहदारी पोलिसांनी लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ६.५० वाजता अलारवाड पुलाकडून बेळगावकडे येणारी कँटरने मालिनी सिटीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या अंदाजे ३० ते ३५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कँटरचालक बशीर अहमद जमादार (रा. हंचिनाळ, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) याच्याविरुद्ध उत्तर रहदारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
मृत व्यक्तीची उंची सुमारे ५ फूट ७ इंच असून बांधा मध्यम, चेहरा लांबट, नाक सरळ आणि रंगाने गव्हाळ आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा हाफ टी-शर्ट, निळ्या रंगाची पँट आणि चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला आहे. त्याच्या उजव्या हातावर आई बाबा अशी मराठी अक्षरे, हनुमानाचे चित्र तसेच उजव्या मुठीवर हृदयाचा टॅटू आहे. डाव्या हातावर पूजा असा टॅटू गोंदलेला आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. याबाबत कुणालाही अधिक माहिती हवी असल्यास उत्तर रहदारी पोलिस ठाण्याशी ०८३१-२४०५२४०, किंवा पोलिस निरीक्षक मोबाईल क्र. ९४८०८०४१०३ यावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.