

बेळगाव : हॉस्टेलमधून घरी गेलेल्या अथणी तालुक्यातील एका तरुणीला हुबळी येथे पुन्हा कॉलेजमध्ये रूजू होण्यासाठी जायचे आहे. सांगली जिल्ह्यातील एका रूग्णाला हुबळी किम्सला जायचे आहे, पुण्याहून अनेकांना बंगळूरला जायचे आहे. परंतु, सध्या तेरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी पाच मोठे राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी रोखल्याने वाहनधारकांची अडचण झाली आहे. ही वैयक्तिक अडचण असली तरी लाखो रूपयांचा माल भरलेल्या मालवाहू वाहनांची अवस्था तर यापेक्षा वाईट बनलेली आहे.
नवी दिल्लीच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारपासून महामार्ग रोको आंदोलन पुकारले आहे. ते मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. पुणे-बंगळूर, हुबळी-सोलापूर, विजापूर-बंगळूर, गुलबर्गा-बंगळूर व नांदेड-चित्रदुर्ग असे मुख्य पाच महामार्ग शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी व विशेषतः टोलनाक्याजवळ रोखलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे.
जाण्याचे सर्वच मार्ग बंद
शेतकरी आंदोलनामुळे ठरावीक मार्ग बंद झालेले नसून कर्नाटकातून महाराष्ट्राला जोडणारे तसेच राज्यांतर्गतही काही मार्गावर आंदोलन सुरू असल्याने तेदेखील बंद झाले आहेत. सध्याचे आंदोलन हे बेळगाव, बागलकोट, धारवाड, कोप्पळ, मंड्या, हावेरी, गुलबर्गा, बिदर, विजापूर, यादगिरी, रायचूर व चामराजनगर या तेरा जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे सीमाभागातच नव्हे तर राज्याती अनेक राष्ट्रीय महामार्गही ठप्प झाले आहेत. बेळगाव जिल्ह्याचा विचार करता पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी नाका, हत्तरगी टोलनाका आणि हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरहून येणारी वाहने कोगनोळीजवळच ठप्प होत आहेत. शिवाय संकेश्वर हुक्केरी येथून येणारी वाहनेही हत्तरगी टोल नाक्याजवळ अडली जात आहेत. बेळगावहून हुबळीला जायचे म्हटले तरी हिरेबागेवाडीजवळ आंदोलन सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांचे सध्या हाल सुरू आहेत.
माहिती नसणाऱ्यांची अडचण
पहिल्या दिवशी पुणे, मुंबईहून बंगळूरकडे जाणाऱ्या व तिकडून पुण्याकडे जाणाऱ्या हजारो वाहनधारकांना आंदोलनाची कल्पना नव्हती. त्यामुळे संपूर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस खात्याने जिल्ह्यातील अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले असले तरी त्या मार्गाने अवजड वाहतूक नेणे जिकीरीचे आहे. तरीही पर्याय नसल्याने वाहने या मार्गाने जात असली तरी गावागावांमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. ऊस दरावर तोडगा निघून हे आंदोलन लवकर न थांबल्यास वाहनधारकांना अधिक मन:स्ताप सहन करावा लागणार आहे.
कोगनोळी येथील टोलनाक्यावर मंगळवारपासून सुरू असलेल्या महामार्ग रोको आंदोलनामुळे निपाणी ते कोल्हापूर व पुणे कडे होणारी वायव्य परिवहन महामंडळाची बस वाहतूक ठप्प झाली आहे. निपाणी आगाराने हुपरीमार्गे कोल्हापूर वाहतूक सुरू ठेवली आहे. ऊस व साखरेच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत संघटना कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी कोगनोळी व हत्तरगी टोलनाक्यावर सुरू केलेले आंदोलन बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते.
या आंदोलनाचा वाहतुकीसह बससेवेवर परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांसह कामगारांची गैरसोय झाली. दिवसभर राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट दिसत होता. बससेवा बंदचा फायदा वडाप व्यावसायिकांनी उचलला राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक बंद असल्याने गिरगावमार्गे वाहतूक करून कोल्हापूरला प्रत्येक प्रवाशाकडून १५० रुपयांची आकारणी करून वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे वडाप व्यावसायिकांना अच्छे दिन आले आहेत.
निपाणी-बेळगाव-कोल्हापूरसह राज्य आंतरराज्य मार्गावर जाणाऱ्या बसेस येथील बसस्थानकात थांबून होत्या. बेळगाव कोल्हापूर मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवल्याने या मार्गावरील प्रवासी, नोकरदारांचे मंगळवारी हाल झाले. बराच वेळ बससेवा नसल्याने त्यांना स्थानकात ताटकळत थांबावे लागले. बस नसल्याने प्रवाशांची गर्दी वाढत चालली होती. काही खासगी वाहने प्रवाशांना घेऊन जात होती. शहरातील विविध वर्दळीच्या रस्त्यासह महामार्गावरही शुकशुकाट दिसत होता.
आंदोलनाची माहिती घेऊन वाहतूक निरीक्षक चालक-वाहकांना माहिती देत होते. दुपारी चारच्या सुमारास बेळगाव मार्गावरील काही मोजक्याच बसेस संकेश्वर, हिडकल डॅममार्गे मार्गस्थ केल्याने प्रवासी, नोकरदार व महिलांना तात्पुरता दिलासा मिळाला. बुधवारी दिवसभर महाराष्ट्राकडे जाणाऱ्या फलाटावर शुकशुकाट दिसत होता. याचा काहीसा परिणाम बाजारपेठेवरही दिसत होता. बेळगावला जाणाऱ्या बसेस कमी करण्यात आल्याने प्रवासी व नोकरदारांचे हाल झाले.