

बेळगाव : उपमहापौर वाणी जोशी यांच्या प्रभागातच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून रहिवासी भीतीच्या छायेत आहेत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चिदंबरनगर येथे मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. रस्त्यातून ये-जा करणार्या लोकांवर ही कुत्री हल्ले करत आहेत. लोकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे लहान मुले, महिला आणि वृध्दांत भीतीचे वातावरण आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी महापालिकेकडे संपर्क साधला तरी तुम्ही महापालिका कार्यालयात अर्ज करावा, त्यानंतर कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे.
कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, लोकांवर हल्ले झाल्यानंतर कारवाई करणार का, असा सवाल करण्यात येत आहे. हा प्रभाग उपमहापौर वाणी जोशी यांचा असून त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून भटक्या कुत्र्यांना आवर घालावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.